मेहकर (तालुका प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यातून जाणार्या समृद्धी महामार्गावरील शिवना पिसा या गावाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात तिघांणा प्राण गमवावे लागले आहेत. तर दोन जर जबर जखमी झाले आहेत. शिवना पिसा गावाजवळ असलेल्या एका कारला मागून आलेल्या दुसर्या कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहने समृद्धी मार्गावरून बाजूला हटवण्यात आली आहेत. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला.
समृद्धी महामार्गावर सकाळी औरंगाबादहून नागपूरच्या दिशेने दोन कार निघाल्या होत्या. यावेळी समृद्धी महामार्गावर बीबी ते शिवनीपिसा गावाजवळ कार (क्रमांक एमएच 49 बीआर 6082) ही मेहकरपासून काही अंतरावर पुढे जात असताना दुसरी कार (क्रमांक MH32C 4490) यांच्यात धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. कारमध्ये झालेल्या या भीषण अपघातातील मृतांची नावं समोर आली आहेत. गौरव खडसने, सनवी सोनटक्के आणि अमित खेरकर अशी मृतांची नावं आहे. हे तिघेही नागपूरचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
११ डिसेंबर पासून सुरु झालेल्या या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी हे अंतर केवळ ५ तासांच पार करता येत आहे. मात्र उद्घाटनापासूनच या महामार्गावर अपघात सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर अवजड वाहनांसाठी प्रतितास ८० किलोमीटर आणि हलक्या वाहनांसाठी प्रतितास १२० किलोमीटरची वेगमर्यादा नेमूण देण्यात आली आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालविणे, नियमाचे उल्लंघन करून अन्य वाहनांना मागे टाकणे अशा काही कारणांमुळे या महामार्गावर भीषण अपघात होत आहेत.