-माऊली मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दिवाळी पहाट कार्यक्रमाचा संगीत मेजवानीने प्रारंभ
-इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता मोहीम आणि इंद्रायणी आरती उत्साहात
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदीच्या धार्मिक परंपरेनुसार यंदा रमा एकादशीच्या दिवशी वसुबारस आल्याने गोवत्स पूजनासह विविध धार्मिक उपक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. माऊली मंदिरात श्रींच्या गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्पसजावट करण्यात आली होती. तसेच दिवाळी पहाट कार्यक्रमाचा संगीत मेजवानीने प्रारंभ झाला. यावेळी भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
माऊली मंदिरात परंपरेनुसार रमा एकादशी आणि वसुबारस विविध धार्मिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिवाळी पहाट कार्यक्रमांतर्गत पहाटे संगीत मेजवानीचे आयोजन करण्यात आले. हरिनामाच्या गजरात आणि संगीतमय वातावरणात या कार्यक्रमाला सुरुवात झाली. भाविकांना हृदयस्पर्शी स्वरांमधील संगीत मेजवानीचा आनंद घेता आला. आळंदी देवस्थानच्या वतीने परंपरेनुसार धार्मिक कार्यक्रमांसह दिवाळी पहाट हा संगीत मेजवानीचा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.
गोवत्स पूजनातून निसर्ग संवर्धनाचा संदेश
वसुबारस हा सण आपल्याला निसर्गाशी जोडणारा आहे. या दिवशी गाय आणि तिच्या वासराचे पूजन करण्याची परंपरा आहे. गाय ही निसर्गाने दिलेली देणगी असून, पंचमहाभूतांचा समन्वय साधत पर्यावरणाचा समतोल राखण्यात तिचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शेतीसाठी आवश्यक खते, औषधे तसेच मानवाला उत्तम आहार देण्यात गाईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे महत्त्व ओळखून आळंदीतील श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था, आळंदी शहर भाजप तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश गरुड आणि अध्यक्ष मोहन महाराज शिंदे यांच्या संकल्पनेतून परिसरात विविध ठिकाणी गोवत्स पूजन उत्साहात करण्यात आले. गाय वाचली तरच निसर्ग वाचेल आणि निसर्ग वाचला तरच आपले अस्तित्व टिकेल, असा संदेश यावेळी देण्यात आला. आनंदी व निरोगी जीवनासाठी गाईचे संवर्धन आवश्यक असल्याचे सांगत वसुबारसदिनी गोमातेचे पूजन करण्यात आले. आळंदी पंचक्रोशीत गाईंचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सहकार्य करण्याचा संकल्पही करण्यात आला. श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत अध्यक्ष मोहन महाराज शिंदे आणि सचिन महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवत्स पूजन उत्साहात पार पडले. आळंदी पंचक्रोशीत ठिकठिकाणी गोवत्स पूजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. भारतीय संस्कृतीत गोपूजनाला विशेष महत्त्व असून, गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस निमित्त गोवत्स पूजन करण्यात आले. आळंदी शहर आणि पंचक्रोशीत अनेक ठिकाणी गोवत्स पूजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाला परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश गरुड यांनी सांगितले. शहरातील विविध ठिकाणी गोपूजनाची व्यवस्था करण्यात आली असून, नागरिक, महिला तसेच गोपूजकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गरुड यांनी केले होते. सार्वजनिक मठ, मंदिरे आणि चौक परिसरात सामाजिक कार्यकर्ते व गोपालकांच्या सहकार्याने गोपूजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमात गोभक्त, गोपालक आणि गोरक्षकांनी सहभाग घेत परंपरा व प्रथा जपण्याचे कार्य केले. माऊली गोशाळेच्या वतीने श्री गणेश हुलावळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोमातेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी परिसरातील गोभक्त, गोपालक आणि नागरिकांनी उत्साहात गोपूजन केले. गोवत्स पूजनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता मोहीम आणि आरती उत्साहात
आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, इंद्रायणी आरती सेवा समिती तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता मोहीम आणि इंद्रायणी आरती उत्साहात पार पडली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. भाजप पुणे शहर सरचिटणीस तथा सांस्कृतिक आघाडीच्या रेश्माताई महाराज वेडे पाटील यांच्या संकल्पनेतून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते. यावेळी भागीरथी कुंडाची स्वच्छता करण्यात आली. या प्रसंगी अरुण घुंडरे, पंकज खैरे, नाझीम शेख, अर्जुन मेदनकर, मंडुबाबा पालवे, बाबासाहेब भंडारे यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी व सेवक उपस्थित होते. इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने एकादशीनिमित्त नित्यनैमित्तिक उपक्रमांतर्गत हरिनामाच्या गजरात इंद्रायणी नदीची आरती करण्यात आली. यावेळी अनिता शिंदे, सरस्वती भागवत, शोभा कुलकर्णी, सुमनताई सोनवणे, कौसल्या देवरे, ज्योती सटले, वेदिका कदम, केसरबाई कदम, जयश्री भागवत, काशी आडकीने, तारामती गोरे, उषाताई पाटील, इंद्रायणी आरती सेवा समितीचे संयोजक अर्जुन मेदनकर, गोविंद ठाकूर पाटील, माऊली घुंडरे, बाबुराव मोरे, पिराजी नेवसे महाराज, दिनकर तांबे यांच्यासह भाविक आणि वारकरी उपस्थित होते. त्रिवेणी भागीरथी कुंड स्वच्छता मोहिमेत आरोग्य विभागप्रमुख साहेब दराडे, मुकादम पांडुरंग बोरगे, कामगार नेते अरुण घुंडरे, पंकज खैरे, संजोग पाटोळे, जय पारवे, योगेश थोरात, सुनील गालफाडे, शीतल खैरे, उज्वला रंधवे, ज्योती जाधव आणि शक्ती खिलारे आदींनी सहभाग घेतला. सर्वांनी परिश्रमपूर्वक जलकुंडाची स्वच्छता केली.