– सातबाऱ्यावर वैयक्तिक कर्जाचा बोजा असलेल्या पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचा मार्ग मोकळा
– बँकांना कर्मचारीवाढ व शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणुकीच्या सूचना
– मयत खातेदारांच्या वारसांचा प्रश्न आठवड्यात न सुटल्यास मुक्कामाचा इशारा
चिखली (अंकुश पाटील) : कर्जमाफी होऊनही विविध तांत्रिक कारणांमुळे पीककर्जापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) जिल्हा प्रबंधक कार्यालयात क्रांतिकारी शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. विनायक सरनाईक व देविदास कणखर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाने नमते घेत अखेर लेखी आदेश जारी केल्यानंतरच हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
सातबाऱ्यावरील वैयक्तिक कर्जाचा बोजा, केवायसी (KYC), मयत खातेदारांच्या वारसांची नोंद आणि बँकांतील तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची मोठी हेळसांड होत होती. यापूर्वी पतसंस्था आणि अर्बन बँकांकडून संबंधित कर्ज हे वैयक्तिक स्वरूपाचे असून पीककर्ज नसल्याची पत्रे देऊनही काही बँकांनी आडमुठी भूमिका घेतली होती. सातबाऱ्यावर बोजा असल्याचे कारण पुढे करत पीककर्ज नाकारले जात असल्याने शेतकरी संतप्त झाले होते.
या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट लेखी आदेश मिळत नाहीत, तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. अखेर जिल्हा प्रबंधकांनी वरिष्ठ अधिकारी व जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून तीन वेगवेगळी लेखी आश्वासने दिली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कार्यालयात कडक बंदोबस्त तैनात केला होता.
मयत खातेदारांच्या वारसांना आठ दिवसांचा इशारा
कर्जमाफीचा लाभ मिळूनही वडील मयत असणे, हाताचे ठसे न जुळणे किंवा जमीन वडिलांच्या नावावर व बँकेचे व्यवहार मुलाच्या नावावर असल्यामुळे ‘फार्मर आयडी’अभावी अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शासनाचे जुने आदेश आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचा संदर्भ देत या शेतकऱ्यांना तत्काळ न्याय देण्याची मागणी करण्यात आली. या प्रश्नावर आठ दिवसांत तोडगा न निघाल्यास मयत शेतकऱ्यांच्या वारसांसह जिल्हा प्रबंधक कार्यालयातच मुक्काम ठोकू, असा इशारा सरनाईक व कणखर यांनी दिला आहे.
तांत्रिक अडचणी आणि कर्मचाऱ्यांची टंचाई
बँकांमध्ये पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे दररोज अवघी २ ते ५ कर्जखाती बंद होत असल्याने शेतकऱ्यांना नाहक फेऱ्या माराव्या लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामीण व शहरी शाखांमध्ये कर्मचारीवाढ करावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात जिल्हा मुख्य बँकेच्या (LDM) अधिकाऱ्यांनी वरिष्ठ बँकिंग अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, शेतकऱ्यांची हेळसांड थांबवून त्यांना बँकांमध्ये सन्मानपूर्वक वागणूक देण्याबाबत बँकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
आंदोलकांचा इशारा:
“लेखी आदेशांची तातडीने अंमलबजावणी करून पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पीककर्ज वितरित करावे आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने याहून अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
या आंदोलनात सुधाकर तायडे, अरुण नेमाने, मुरलीधर येवले, गजानन पंडित, भीमराव हिवरकर, विठ्ठल शेळके, औचितराव वाघमारे, खुशालराव कणखर, दत्तात्रय कणखर, प्रभाकर पोटे, गजानन हिवरकर यांच्यासह चिखली व बुलढाणा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.