– ‘दिवाळीपूर्वीची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ’ – तुपकर आक्रमक
– ‘हेक्टरी १ लाख रुपये द्या, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन अटळ!’
बुलढाणा (बाळू वानखेडे): दिवाळीच्या तोंडावर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांची मदत जमा करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र, ही घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असून, त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट करत शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. सध्या शेतीचा खर्च पाहता हेक्टरी लाखभर रुपये खर्च होत असताना, सरकार केवळ पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. ही तुटपुंजी मदत आम्हाला अजिबात मान्य नाही. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका तुपकरांनी मांडली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना, “पाच हजार रुपये देता म्हणजे आम्हाला काय भिकारी समजता का?” असा संतप्त सवाल विचारत तुपकरांनी, “पाच हजार रुपयांची मदत आम्ही तुम्हाला देतो, आमच्याकडे वर्षभर राहून दाखवा आणि याच पैशांत तुमची दिवाळी साजरी करून दाखवा,” असे थेट आव्हान सरकारला दिले आहे. आम्ही देशाचे पोशिंदे आहोत. आमच्या घामातूनच सर्वसामान्यांच्या ताटात अन्न येते. “आम्ही शेतात पेरा केला नाही, तर तुम्ही काय धतुरा खाणार?” असा झणझणीत सवाल त्यांनी उपस्थित केला. जमिनीची मशागत, बियाणे, खते, कीटकनाशके, फवारण्या आणि मजुरी करताना शेतकऱ्याचा खिशातील पैसा संपतो व कर्जबाजारी व्हावे लागते. अशा वेळी निसर्गाच्या लहरीपणामुळे हातात काहीच आले नाही, तर संसाराचा निभाव कसा लावायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हेक्टरच्या मर्यादेचे बंधन न ठेवता हेक्टरी १ लाख रुपये सरसकट भरपाई मिळायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली. शेतकरी शांत आहे म्हणजे तो असहाय्य नाही. सरकारने शेतकऱ्यांना गृहीत धरण्याची चूक करू नये. जर योग्य न्याय मिळाला नाही, तर गावागावांतून शेतकरी पेटून उठतील आणि सरकारविरोधात मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा तुपकरांनी दिला आहे.
आता दिवाळी तोंडावर असताना जाहीर केलेल्या या मदतीवर शेतकरी वर्ग संतप्त असून, सरकार यावर काय भूमिका घेणार आणि शेतकऱ्यांना कसा दिलासा देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.