-२५ दिंड्यांचा सहभाग; ‘श्री पलसिद्ध बोला’च्या नामघोषाने साखरखेर्डा नगरी दुमदुमली
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील श्रीमज्जगद्गुरू पलसिद्ध शिवाचार्य महास्वामी यांचा ९६८ वा स्मृतीमहोत्सव सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) सुरू झाला. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी साखरखेर्डा नगरीतून भव्य पालखी सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध ठिकाणांहून आलेल्या २५ दिंड्यांनी सहभाग घेतला.
सकाळी सहा वाजता नामस्मरणाने महोत्सवाला प्रारंभ झाला. दुपारी १२ वाजता शिवदीक्षा व गुरुमंत्र संस्कार विधी पार पडला. दुपारी दोन वाजता सहभागी दिंड्यांचे मठाधिपती शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुपारी तीन वाजता साखरखेर्डा नगरीतून भव्य पालखी सोहळ्याच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. ‘मार्गे हळूहळू चला, मुखाने श्री पलसिद्ध बोला’ या नामघोषात पावली खेळत मिरवणूक मार्गस्थ झाली. श्री पलसिद्ध महास्वामी मठ येथून सुरू झालेली मिरवणूक श्री संत संताजी जगनाडे महाराज चौक, गुजरी चौक, गणपती चौक, अहिल्याबाई होळकर नगर, महात्मा ज्योतिबा फुले नगर, हिंदू सूर्य महाराणा प्रताप नगर, संत रविदास महाराज चौक, बसस्थानक परिसरातून मार्गक्रमण करत सायंकाळी पुन्हा मठात दाखल झाली. मिरवणुकीच्या मार्गावर गावातील माता-भगिनींनी सडा-मार्जन करून रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. विविध ठिकाणी महिलांनी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले.
मिरवणुकीत श्री सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज अश्वारूढ झाले होते. आप्पास्वामी पालखी दिंडी, रिसोड, लक्ष्मणस्वामी दिंडी, आष्टी यांच्यासह परळी वैजनाथ, लोहगड, नांद्रा, पानकन्हेरगाव, काटा, परभणी, साडेगाव, जालना, गुंधा, घाटबोरी, डोणगाव, लोनगाव, वेणी आणि चारठाणा येथील दिंड्यांनी सहभाग घेतला. कीर्तनकार नागेश स्वामी, नंदकिशोर स्वामी आणि विश्वनाथ स्वामी हेही मिरवणुकीत सहभागी झाले होते. माजी उपसरपंच रामदाससिंग राजपूत, आशिष बेंदाडे, विश्वनाथ अप्पा जितकर, रमेश बेंदाडे यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी मिरवणुकीत सहभागी होऊन सेवा बजावली. मिरवणुकीच्या मार्गावर अनेक ठिकाणी भाविकांसाठी चहा, पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. ठाणेदार युवराज रबडे, पोलीस हवालदार रामदास वैराळ यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.