– दणकेबाज वाढदिवस कार्यक्रमच नाही, तर बुलढाण्याच्या ‘भैय्या’चा पुढील निवडणुकीत ‘करेक्ट कार्यक्रम’?
– जयस्तंभ चौकातील होर्डिंग पाहून गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांचा ‘खाक्या’; दहशत पसरवणाऱ्यांची हवा गुल!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दोन तारखांनी बुलढाण्याच्या राजकारणात असा काही बार उडवून दिला आहे की, अनेकांच्या राजकीय अस्तित्वाला सुरुंग लागला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसाचे फलक संपूर्ण शहरात लागलेले असतानाच, जयस्तंभ चौकात झळकलेल्या एका महाकाय कटआऊटने स्थानिक ‘भैय्या’ आणि त्यांच्या लांगूलचालन करणाऱ्या कंपूचा पुरता ‘बीपी’ वाढवला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील (CMO) उच्चपदस्थ अधिकारी विद्याधर महाले, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा हा कटआऊट शहरात उभा राहताच, तथाकथित बालेकिल्ल्याच्या तटबंदीला तडे गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. ‘साहेब’ नुसताच दणकेबाज वाढदिवस बुलढाण्यात साजरा करणार नाहीत, तर पुढील निवडणुकीत बुलढाण्याच्या या ‘भैय्या’चा ‘करेक्ट कार्यक्रम’देखील करण्यास सज्ज झाले आहेत. चिखलीत येऊन बेंडकुळ्या फुगविणाऱ्या या ‘भैय्या’च्या पायाखालची वाळू चांगलीच सरकलेली दिसून येत आहे.
बुलढाण्याच्या स्थानिक राजकारणातील ‘भैय्या’ रोज उठून चिखलीत टोळके घेऊन तळ ठोकतात, तिकडे जाऊन वाढदिवसाचे केक कापतात, तेव्हा सर्वकाही लोकशाही आणि संविधानाला धरून चालते. मात्र, चिखलीचे ‘साहेब’ बुलढाण्यात आपल्या हक्काच्या घरात वाढदिवस साजरा करायला आले, तर मात्र काही स्वयंघोषित ठेकेदारांच्या पोटात भयंकर गोळा आला आहे. दुसऱ्याच्या अंगणात जाऊन खड्डे खणणाऱ्यांना शेजारी आपल्या अंगणात येऊन शांत बसलेलेही सहन होत नाही, असाच हा राजकीय जळफळाट ठरला आहे.
जयस्तंभ चौकातील कटआऊट पाहून ज्यांची तथाकथित दहशत धोक्यात आली, त्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे गोंधळ घालण्यासाठी भाडोत्री उपद्रवी घटक पुढे सरकवले. मात्र, बुलढाणा पोलिसांनी वेळीच खाकीचा धाक दाखवत या उपद्रव्यांना असा काही ‘प्रसाद’ दिला की, ‘दहशत’ पसरवणाऱ्यांची पुरती हवा निघाली. कायदा हातात घेऊ पाहणाऱ्यांना आणि वाढदिवसाच्या नावाने राजकीय गुंडगिरी करणाऱ्यांना ही सणसणीत चपराक मानली जात आहे. या हायव्होल्टेज राजकीय शक्तिप्रदर्शनात आपली ‘मेणबत्ती’ विझू नये म्हणून शहरातील अनेक शासकीय अधिकारी, सोयीस्कर भूमिका घेणारे पत्रकार आणि दोन्ही दगडांवर पाय ठेवणारे हितचिंतक अचानक ‘आजारपणाचे’ कारण पुढे करून शहराबाहेर पसार झाले आहेत. दोन्ही बाजूंच्या वादात आपला गेम होऊ नये म्हणून अनेकांनी आधीच सुरक्षित अंतर गाठले आहे.
रॅली, डीजे आणि महाप्रसाद; १ सप्टेंबरला बुलढाण्यात शक्तिप्रदर्शन!
एका बाजूला हा जळफळाट सुरू असताना, १ सप्टेंबर रोजी विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त सहकार विद्या मंदिर सभागृहात भव्य अभीष्टचिंतन सोहळा रंगणार आहे. धाड नाक्यापासून प्रसिद्ध ‘देव मामलेदार’ बँड आणि डीजेच्या दणदणाटात भव्य रॅली निघणार असून, महाले हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ माॅसाहेब, महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत पायी चालणार आहेत. अवघ्या एका कटआऊटने विरोधकांची झोप उडवली असताना, १ सप्टेंबरच्या या शक्तिप्रदर्शनानंतर बुलढाण्याच्या राजकारणात कोणाचे बॅनर्स फाटतात आणि कोणाची कायमची राजकीय हवा निघते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.