-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. शिवाजीराव राठोड यांना ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’; तीन दशकांच्या उल्लेखनीय सेवेचा गौरव
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शिवाजीराव राठोड यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करून गौरविण्यात आले. पोलीस दलातील प्रदीर्घ, उल्लेखनीय आणि निष्कलंक सेवेची दखल घेत भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने त्यांची या मानाच्या पदकासाठी निवड केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका साध्या तांड्यावर ३ फेब्रुवारी १९७१ रोजी जन्मलेल्या डॉ. शिवाजीराव राठोड यांचा हा प्रवास ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्यांचे वडील थाऊ राठोड हे शिक्षक, अभ्यासू शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते होते. प्रतिकूल परिस्थिती, मर्यादित सुविधा आणि ग्रामीण भागातील संघर्षांवर मात करत डॉ. राठोड यांनी शिक्षण पूर्ण केले. मुंबई विद्यापीठातून प्राणीशास्त्र विषयात पदवी घेतल्यानंतर त्यांनी कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे उच्च दर्जाचे संशोधन करून पीएच.डी. पदवी संपादन केली. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी प्रशासकीय सेवेची वाट निवडली. १९९६ मध्ये MPSC परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत त्यांनी पोलीस दलात प्रवेश केला.
३० वर्षांची उल्लेखनीय कारकीर्द
तीन दशकांच्या प्रदीर्घ सेवेत डॉ. राठोड यांनी मूर्तिजापूर, पैठण, कोल्हापूर, नाशिक तसेच नांदेड एसीबी येथे विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. ठाणे आणि उल्हासनगर येथे पोलीस उपायुक्त म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले. लातूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना महिला सुरक्षेसाठी ‘तेजस्विनी (दामिनी) पथक’, गावागावांत तंटामुक्ती समित्या, ग्रामरक्षक दल आणि ‘पोलीस मित्र’ यांसारखे उपक्रम राबविले. या उपक्रमांमुळे पोलीस आणि नागरिकांमधील संवाद वाढण्यास तसेच सर्वसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास दृढ होण्यास मदत झाली. यानंतर त्यांनी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, मुंबईचे पोलीस उपायुक्त आणि नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली. सध्या ते ठाणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. वाढत्या नागरी आव्हानांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यावर त्यांचा भर आहे.
कर्तव्य कठोर; मनाने कलाकार
गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेणारे डॉ. राठोड वैयक्तिक जीवनात मात्र संवेदनशील आणि कलाप्रेमी अधिकारी म्हणूनही परिचित आहेत. लातूर येथे कार्यरत असताना आश्रमशाळेतील एका कार्यक्रमात त्यांनी ‘आशिकी’ चित्रपटातील गाणी आपल्या मधुर आवाजात सादर केली होती. त्यांच्या गायनाने उपस्थित विद्यार्थी भारावून गेले होते. कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता, कठोर परिश्रम आणि सामाजिक बांधिलकी या गुणांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो. यापूर्वी पोलीस महासंचालकांचे मानचिन्ह (D.G. Insignia) मिळविलेल्या डॉ. शिवाजीराव राठोड यांच्या तीन दशकांच्या समर्पित सेवेचा ‘अति उत्कृष्ट सेवा पदका’ने झालेला गौरव त्यांच्या कार्याची पावती मानला जात आहे. पाथर्डी तालुक्यातील साध्या तांड्यावरून सुरू झालेला प्रवास ठाणे शहराच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदापर्यंत पोहोचविणाऱ्या डॉ. राठोड यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.