नोकरदारांना गोंजारले; शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले!

admin 9 Min Read
9 Min Read

केंद्रीय अर्थसंकल्पातून नोकरदार खूश; १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त!

– अर्थसंकल्पातून शेतकर्‍यांची निराशा – रविकांत तुपकर
– ३६ जीवन रक्षक औषधे स्वस्त करणार, ड्युटी टॅक्स हटविला
– किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखांहून पाच लाख केली
– एआय तंत्रज्ञानावर भर देणार, ५०० कोटींची राखीव तरतूद
– आयआयटी, मेडिकलच्या जागा वाढविणार, तीन एआय सेंटर उघडणार

नवी दिल्ली (आवेश तिवारी) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा आर्थिक वर्ष २०२५-२०२६चा अर्थसंकल्प आज (दि.१ फेब्रुवारी) रोजी संसदेत सादर केला. सकाळीच या अर्थसंकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. हा अर्थसंकल्प नोकरदारांना खूश करणारा ठरला असून, १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. तसेच, मेडिकलच्या जागा वाढविल्या जाणार असून, ३६ जीवन रक्षक औषधी स्वस्त करण्यासाठी त्यांच्यावरील ड्युटी टॅक्स पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसची मर्यादा १ लाखांपर्यंत वाढवली आहे. याशिवाय, आयकर भरण्याची मर्यादा ४ वर्षांपर्यंत वाढवली आहे. शेतकर्‍यांना दिलासा देत, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखांहून पाच लाख करण्यात आली आहे. शेतमालाला हमीभावाचा कायदा, शेतकरी कर्जमाफी या महत्वाच्या मागण्यांना मात्र अर्थसंकल्पात बगल देण्यात आली असून, हा अर्थसंकल्प शेतकर्‍यांना निराशाजनक असल्याची तिखट प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे. तसेच, विरोधकांनीही या अर्थसंकल्पावर टीकास्त्र डागले असून, सत्ताधारी पक्षाने मात्र अर्थसंकल्पाचे जोरदार स्वागत केले आहे. करमुक्त उत्पन्नामुळे नोकरदारवर्ग मात्र कमालीचा खूश झाला असून, त्याच्या हाती शिल्लकचे पैसे खुळखुळणार आहे.

आज दि. १ फेब्रुवारीरोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात प्राप्तीकर स्लॅबमध्ये बदल करण्यात आले असून, १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. गेल्या अर्थसंकल्पात कराचे दर वाढवण्यात आले होते आणि यावेळी सरकारने मध्यमवर्गीयांसाठी काही दिलासादायक पावले उचलणे अपेक्षित होते. जी उचलण्यात आल्याचे दिसून आले आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर १ लाख कोटींचा बोजा पडणार आहे. मात्र तो सहन करुन सरकारकडून ही भेट मध्यमवर्गाला देण्यात आली आहे. नवीन करप्रणाली अंतर्गत हा बदल करण्यात आला असून, यापूर्वी ७ लाख रुपयांच्या कमाईवर कोणताही कर भरावा लागत नव्हता. स्टँडर्ड डिडक्शन फक्त ७५,००० रुपये ठेवण्यात आले आहे. पण, १२ लाखांच्या पुढे उत्पन्न असलेल्या करदात्यांनाही अर्थमंर्त्यांनी दिलासा दिला आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखांवरून पाच लाखांवर करण्यात आली आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार असून, या शेतकर्‍यांना आता कृषी आणि पूरक साहित्य खरेदीसाठी मोठी रक्कम मिळणार आहे. आर्थिक सर्वेक्षण २०२४-२०२५ नुसार, मार्च २०२४ पर्यंत, देशातील किसान क्रेडिट कार्डधारकांची संख्या ७.७५ वर पोहोचली आहे. तर या योजनेतील थकीत कर्जाची रक्कम ९.८१ लाख कोटी रूपयांवर पोहोचली आहे. तसेच, सुधारित व्याज सबव्हेंशन स्कीम २०२४-२०२५ साठी दाव्यांची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक करण्यासाठी सरकारने किसान ऋण पोर्टल सुरू केले आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत या पोर्टलद्वारे १ लाख कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे दावे निकाली काढण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत सध्या ५.९ कोटी शेतकरी लाभ घेत आहेत.

दरम्यान, या अर्थसंकल्पावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी टीकास्त्र डागले आहे. शेतकर्‍यांची कर्जमुक्ती झाली नाही, शेतमालाला हमीभावाचा कायदा झाला नाही, शेतमाल गोदामं मिळाली नाही, एकूणच या अर्थसंकल्पातून शेतकर्‍यांना फायदेशीर ठोस असे काहीही मिळालेले नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकर्‍यांसाठी निराशाजनक असल्याचे तुपकर यांनी सांगितले.

मोदी सरकारने केवळ १२ लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांनाच दिलासा दिलेला नाही. तर १२ लाख ते ५० लाख वार्षिक उत्पन्न असणार्‍या करदात्यांनाही मोठा दिलासा दिला आहे. १२ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्याला ८० हजार रुपये फायदा मिळेल. तर १६ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्याला ५० हजार रुपयांचा फायदा होईल. हेच उत्पन्न २० लाख रुपये झाले तर ९० हजार रुपयांची बचत होणार आहे. तर २४ लाखांचे वार्षिक उत्पन्न असलेल्यांचे आता १,१०,००० रुपये वाचतील. ५० लाखांपर्यंत कमावणारे करदाते १,१०,००० रुपये बचत करू शकतात. अर्थमंत्री म्हणाल्या, की पुढील आठवड्यात नवीन प्राप्तीकर विधेयक आणले जाईल. आम्ही निर्यात क्षेत्रात योजना सुरू करू. एमएसएमईंना परदेशात टॅरिफ सहाय्य मिळेल. पुढील आठवड्यात नवीन विधेयक आणले जाईल. या प्रत्यक्ष कर सुधारणा नंतर स्पष्ट केल्या जातील. विमा क्षेत्रासाठी एफडीआय मर्यादा वाढवणार आहे, अशाही घोषणा त्यांनी केल्या. सध्या नवीन कर प्रणालीमध्ये ३ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. तर ३ ते ७ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ५ टक्के कर आकारला जातो. ७ ते १० लाख रुपयांच्या उत्पन्नावर १० टक्के कर भरावा लागतो. सध्या १० ते १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर १५ टक्के कर आकारला जातो.


अर्थसंकल्पात शेतकर्‍यांसाठी काय?

– शेतकर्‍यांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा
– राज्यांसोबत भागीदारीत धनधान्य योजना राबवणार
– कृषी जिल्हा विकास योजना असेल
– कमी उत्पादन होणार्‍या १०० जिल्ह्यांत योजना राबवणार
– १ कोटी ७० लाख शेतकर्‍यांना लाभ होईल
– उत्पादकता वाढवणे, पीक विकास, साठवणूक वाढवणार
– सिंचन वाढवणार, लघु व मध्यम मुदतीचे कर्ज देणार
– डाळींमध्ये देश आत्मनिर्भर बनवणार
– तेलबियांप्रमाणे आता डाळींसाठीही योजना राबवणार
– डाळींसाठी ६ वर्षांचा आत्मनिर्भर अभियान राबवणार
– तूर, उडीद आणि मसूर दाळींवर अभियानावर लक्ष केंद्रीत
– नाफेड, एनसीसीएफसारख्या संस्था डाळींची खरेदी करेल
– नोंदणीकृत शेतकर्‍यांकडून केंद्रीय संस्थांकडून डाळखरेदी
– भाजीपाला आणि फळांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम
– उत्पादन, प्रभावी पुरवठा आणि योग्य किंमत देणार
– फळे-भाज्यांचा कार्यक्रम राबवणासाठी नवी यंत्रणा उभारणार
– कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी पाच वर्षांचे विशेष अभियान
– कापसाच्या विविध जाती विकसित करणार
– विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कापूस उत्पादनाला जोड देणार
– दर्जेदार कापूस निर्यातीवर सरकार भर देणार


२०२५ च्या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांनाही मोठी सवलत देण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी घोषणा केली आहे की आता किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी त्यांच्या शेती आणि पशुपालनासाठी सहजपणे कर्ज घेऊ शकतील. अर्थमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रालाही मोठी चालना दिली आहे. पुढील वर्षी देशभरात १०,००० नवीन वैद्यकीय जागा जोडल्या जातील, अशी घोषणा त्यांनी केली. यामुळे डॉक्टरांची संख्या वाढेल आणि वैद्यकीय सेवा सुधारतील. रूग्णांसाठीही केंद्र सरकारने आपले हात मोकळे करत गंभीर आजारावरील ३६ औषधे ड्युटी प्रâी केली आहेत. त्यामुळे ही औषधे स्वस्तात मिळणार आहेत. सर्व सरकारी रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर बनवण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. कॅन्सरवरील उपचारासाठीची औषधे आता स्वस्त होणार आहे. सहा जीवन रक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी ५ टक्के करण्यात आली आहे. मेडिकल कॉलेजात अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली असून, ५ वर्षात १० हजार मेडिकलच्या जागा वाढवण्यात येणार आहेत. आयआयटीमध्ये ६५०० जागा वाढवण्यात येणार आहेत आणि तीन एआय सेंटर उघडण्यात येणार आहेत. एआय शिक्षणासाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

– या गोष्टी स्वस्त झाल्या –

– मोबाईल फोन स्वस्त झाले
– कर्करोगाची औषधे स्वस्त झाली
– वैद्यकीय उपकरणे स्वस्त होतील
– एलसीडी, एलईडी स्वस्त झाले
– ६ जीवनरक्षक औषधे स्वस्त झाली
– ८२ वस्तूंवरील उपकर हटवण्याची घोषणा
– भारतात बनवलेले कपडे स्वस्त होतील
– सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवर कर सवलत दिली आहे. यामुळे बॅटरीवर चालणार्‍या गाड्या स्वस्त होऊ शकतात.
– चामडे आणि त्याच्या उत्पादनांवरील कर कमी करण्यात आले आहेत, ज्यामुळे वस्तू स्वस्त होतील.
—-
– काय महाग झाले? –
अर्थसंकल्पात, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्लेवरील मूलभूत सीमाशुल्क १० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आले.


अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा

– महिलांसाठी विशेष तरतूद
– बिहारमधील शेतकर्‍यांसाठी विशेष तरतूद
– कृषीक्षेत्रात गुंतवणुकीत प्राधान्य
– राज्यांमध्ये विविध योजना राबविल्या जाणार
– ग्रामीण महिलांसाठी विशेष योजना राबवविणार
– देशातील १०० जिल्ह्यांवर विशेष लक्ष
– मत्स्य उत्पादनावर विशेष योजना
– टेक्स्टाईल क्षेत्रात अधिक भर
– डाळ उत्पादनासाठी ६ वर्षे विशेष योजना
– एमएसएमई योजनेला २० कोटीपर्यंत कर्ज
– आसाम मध्ये युरिया प्रकल्प उभारणार
– सक्षम आंगणवाडी बनविणार


शेतीक्षेत्राला काय? वाचा CA Finalist शुभम कोलते यांची नोटस

Share This Article
Exit mobile version