नोंदणी कसली मागता? ९२ नंबर बघाच!; या उत्तराने सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाची झाली अडचण!
सोलापूर (संदीप येरवडे) – नोंदणी प्रमाणपत्र कसले मागता? निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन ९२ क्रमांक तपासून पहा, असे उत्तर लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे यांना नोटीस बजावली आहे. माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक संजय बानूर यांच्या बदलीच्या मागणीसाठी लोकशासन आंदोलन पार्टीने गेल्या ३८ दिवसांपासून पुनम गेटवर चक्री उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाचे दखल घेत, प्रभारी सीईओ आव्हाळे यांनी लोकशासन आंदोलन पार्टीला नोटीस दिली आहे. यामध्ये तुमच्या पार्टीची नोंदणी आहे काय? बानूर यांच्याविरोधात पुरावे द्या, अन्यथा शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, लोकशासन आंदोलन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे- पाटील हे आहेत. या पार्टीला निवडणूक आयोगाची मान्यता आहे. आयोगाच्या लिस्टमध्ये ९२ क्रमांकाचा आमचा पक्ष आहे. त्यामुळे झेडपी प्रशासनाने याबाबत खातरजमा करण्याचे दिंडोरे यांनी स्पष्ट केले आहे. त्याबाबत त्यांनी आलेल्या नोटिसाला उत्तर दिले आहे.
माध्यमिक शिक्षण विभागात मी काय शिक्षणाधिकारी नाही, किंवा माझ्याकडे सह्याचा अधिकार नाही. मी एक साधा क्लार्क आहे. त्यामुळे माझ्याविरुद्ध आता कोणी काय आंदोलन किंवा उपोषणाला बसले आहे हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जरी माझी बदली केली तरी मला कुठेही कामच करायचे आहे.
– संजय बानूर, वरिष्ठ लिपिक माध्यमिक शिक्षण विभाग
अमेरिका जपानचे अधिकारी सोलापूरला द्या!
सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ व जिल्हाधिकारी यांच्याकडून आम्हाला न्याय मिळत नाही. त्यामुळे आम्हाला अमेरिका, जपान येथील अधिकारी देण्याची मागणी केली. जेणेकरून आम्हाला न्याय मिळू शकेल, अशी मागणी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे लोकशासन पार्टीचे दिंडोरे व मारुती जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
——————-