सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील संजय बानूर यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे लोकशासन पार्टीचे मारुती जाधव व राजाभाऊ दिंडोरे यांनी केली आहे.
संजय बानूर यांनी शिक्षण विभागात आल्यापासून चार दलाल पगारीवर ठेवलेले आहेत. ते फाईली गोळा करून आर्थिक देवाण घेवाण करतात. माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर व बानूर यांचे मोठे भांडण झालेले आहे. जुळे सोलापूर येथील भारती विद्यापीठ येथे या दोघांची भांडणे मिटविण्यात आले होते. संजय बानूर यांना घाबरून शिक्षणाधिकारी चार्ज घेण्यास येत नाहीत. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागातील एक-एक कर्मचा-याला आपण बोलावून त्यांची विचारपूस करावी. हेच लोक बानूर यांच्याबाबत पुरावे देतील. महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा परिषद येथील शिक्षण विभागात सर्वात जास्त ट्रॅप झालेले आहे. बानूर यांच्यामुळे शिक्षण विभाग सर्वात जास्त बदनाम झाले आहे. या बदनामीमुळे सीईओ दिलीप स्वामी यांनी २० कर्मचार्यांची तात्काळ बदली केली होती. त्यामुळे बानूर यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे, असे या निवेदनात नमूद आहे.
बानूर यांच्या बदलीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आमच्याकडून पुरावे मागण्यापेक्षा आम्ही दिलेल्या माहिती अधिकारामध्ये विचारलेल्या माहितीची अद्याप माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे हाच मोठा पुरावा आहे.
– मारुती जाधव, तक्रारदार
——————-