आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, चऱ्होली बुद्रुक मधील वार्षिक स्नेहसंमेलन भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात अतिशय उत्साहात पार पडले.
कार्यक्रमासाठी सा रे ग म फेम सुप्रसिद्ध पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी गायक मेश्राम यांनी आपल्या मधुर आवाजात भक्तीगीते सादर केली. तर प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. नगरसेविका सुवर्णाताई बुर्डे , उद्योजक ऍड कुणाल तापकीर, प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग पिंपरी चिंचवड महापालिका संजय नाईकडे, ए,आ, ई संस्थेच्या संस्थापिका डॉ. स्वाती मुळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी संस्थे तर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, शेले, श्रीफळ व रोपे देऊन सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष विनायक भोंगाळे यांनी मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा हेच आमचे ब्रीद आहे. संचालिका कविता कडू पाटील, विश्वस्त सरिता विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत , सुदाम मुंडे उपस्थित होते.
चिमुकल्यां पासून मोठ्यांपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांनी आपापल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करून पालकांचे मन प्रफुल्लित केले. यावेळी कविता कडू पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व कॉलेजच्या प्राचार्या, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी सर्वांचा सहभाग मोलाचा ठरला.