मेहकर (तालुका प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच सामाजिक जाणीव ठेवणे गरजेचे आहे. आज समाजाला संवेदनशील माणूस हवा आहे. स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजातील गोरगरीब माणसांसाठी आपला देह झिजविणार्या माणसांची खरी गरज आहे. राष्ट्रीय सेवा योजना खर्याअर्थाने समाजात चारित्र्यसंपन्न माणूस घडवण्याचे महान कार्य करीत आहे, असे उद्गार राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.श्याम ठोंबरे यांनी काढले.
प.पू शुकदास महाराजश्री संस्थापित विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते, सचिव एस.टी गोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित धांडे, दत्तकग्राम दुधा येथील सरपंच सौ.संगीताताई पाखरे, ओलांडेश्वर संस्थांचे अध्यक्ष मंचकराव देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष अनंतराव जंजाळ, भानुदास पाखरे उपस्थित होते. पुढे डॉ.श्याम ठोंबरे म्हणाले की, शिबिरात प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. रासेयोतून मुली आत्मनिर्भर बनण्यास बरीच मदत होत आहे. राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणते, असेही डॉ. ठोंबरे यांनी सांगितले. तर विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी रासेयो हे एक मुक्त व्यासपीठ आहे. स्वयंसेवक या शिबिरात स्वावलंबी बनण्याचे कौशल्य शिकतात, असे मत विवेकानंद आश्रमाचे सचिव एस.टी गोरे सर यांनी व्यक्त केले. तसेच, विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचे चारित्र्य जपले पाहिजे. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. रासेयोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यास खूप मदत होते, असे विचार तंटामुक्ती अध्यक्ष अनंतराव जवंजाळ यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ज्ञानेश्वर गाडे यांनी सात दिवसीय शिबिराची रूपरेषा मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पुनम कणखर व कु.सायली भगत या विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमाला प्रा.अनिल न्हावी, प्रा. गणेश चिंचोले. प्रा.श्रीकांत दाभाडे, सह कार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन ठाकरे, प्रा.अभय मासोदकर, प्रा.मनोज मुर्हेकर, प्रा.विठ्ठल ताटर तसेच गावकरी मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते.
—————–