– एकाच समाजातील दोघांतील आपसी वादातून घटना घडल्याची चर्चा
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – जानेफळ पोलिस ठाणेहद्दीतील सारशीव येथील नवनियुक्त महिला सरपंचाला घरात घुसून मारहाणप्रकरणी धक्कादायक गावचर्चा प्रस्तुत प्रतिनिधीच्या कानावर आली असून, एकाच समाजातील दोन तरुणांच्या वैयक्तिक वादाला आणि हाणामारीला व्यापक स्वरुप देऊन खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव निर्माण केला जात असल्याचे गावातील सुज्ञ ग्रामस्थांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले आहे. याबाबत जानेफळचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल गोंदे यांच्याशी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने संपर्क साधला असता, त्यांनीदेखील अशी काहीच घटना घडली नसल्याचे स्पष्ट सांगून, आम्हाला फोन आला तेव्हा आमचे कर्मचारी तातडीने तेथे पोहोचले होते. त्यावेळेस फिर्यादी हे आरामात घरात टीव्ही पाहात बसले होते, अशी माहिती गोंदे यांनी दिली. याबाबतची सविस्तर नोंद स्टेशन डायरीला घेतली गेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘तू फुकट सरपंच झाली’ असे म्हणत १४ ते १५ लोकांनी घरात घुसून मारहाण केल्याबाबत मेहकर तालुक्यातील सारशीव गावाच्या नवनियुक्त सरपंच रमाबाई जाधव यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक व जानेफळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु, वस्तुस्थिती वेगळी असल्याने पोलिसांनी तूर्त हे प्रकरण चौकशीवर ठेवलेले आहे. या घटनेतील महिला सरपंच जाधव यांचा मुलगा मनिष दादाराव जाधव याच्याविरोधात जानेफळ पोलिस ठाण्यात यापूर्वीच विविध पाच गुन्हे दाखल आहेत. तसेच, काही लोकं घरात घुसून मारहाण करत आहेत, घरावर दगडफेक करत आहेत, असा फोन मनिषने पोलिसांना केल्यानंतर तातडीने गावात पोलिस पाठवण्यात आले असता, घटनास्थळी असे काहीच घडले नसल्याचे दिसून आले. उलट पोलिस पोहोचले तेव्हा मनिष जाधव हा घरात टीव्ही पाहात बसला होता, असे पोलिसांना दिसून आले. याबाबतची सविस्तर नोंद जानेफळ पोलिस स्टेशन डायरीला घेण्यात आलेली आहे. दोन युवकांच्या वैयक्तिक भांडणातून हा प्रकार घडला असून, समोरच्या युवकालासुद्धा पोटात धारदार काही तरी लागलेले आहे. याबाबत घरात घुसून मारहाणीची तक्रार देण्यात आल्यानंतर ही तक्रार पोलिसांनी सद्या चौकशीवर ठेवली असून, वस्तुस्थिती व पुरावे पाहाता पोलिसांना विपरित माहिती मिळालेली आहे. त्याबाबतदेखील जानेफळ पोलिस हे अधिक तपास करत आहेत. खोटे कथानक रचून खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव निर्माण केला जात असल्याचे एकंदरित या घटनेतून दिसून येत आहे.
नवनियुक्त महिला सरपंचाला घरात घुसून मारहाण वैगरे अशी काही घटना आमच्या हद्दीतील सारशीव या गावी घडलेली नाही. फिर्यादीच्या मुलाचा फोन आल्यानंतर तातडीने त्यांच्या घरी पोलिस पोहोचले असता, असे काहीच दिसून आले नाही. उलट फिर्यादीचा मुलगा हा आरामात घरी टीव्ही पाहात असल्याचे दिसून आले. तरीही आम्ही या प्रकरणाची चौकशी केली असून, वस्तूस्थितीची नोंददेखील स्टेशन डायरीला घेतलेली आहे. यातील मनिष दादाराव जाधव याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल असून, ग्रामस्थांच्या काही तक्रारी प्राप्त आहेत. पोलिस सखोल चौकशी करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करेल. परंतु, फिर्यादी जे सांगत आहे, की आम्हाला १४ ते १५ लोकांच्या जमावाने मारहाण केली, घरात घुसले ती वस्तुस्थिती दिसून आलेली नाही.
– राहुल गोंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, जानेफळ