नागरी विमान सेवेसाठी पेटून उठा, मी तुमच्या पाठीशी – युवराज संभाजीराजे छत्रपती
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – नागरी विमान सेवेसाठी पेटून उठा, मी तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही राज्यसभेचे माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज यांनी सोलापूर विकास मंचच्या पदाधिकार्यांना दिली. याप्रश्नी सोलापूर विकास मंचच्या पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली.
सोलापूरच्या विमानसेवेविषयी लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेबद्दल सोलापूरकरांनी जाब विचारायला हवा, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले. त्याच अनुषंगाने मराठा मोर्चाचे समन्वयक माऊली पवार यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव आणि अॅड. दत्तात्रय अंबुरे यांनी युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज यांनी भेट घेऊन होटगीरोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाची चिमणी आणि बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळास सोलापूर विकास मंचचा कोणत्याही विरोध नसून, आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे ही काळाची गरज आहे, पण तूर्त ते निर्माण होईपर्यंत होटगीरोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होणे हे व्यवहार्य आहे, असेही त्यांनी या भेटीत सांगितले.
मूळचे कोल्हापूरचे आणि सद्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली आणि पुढाकाराने सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा आणि योगीन गुर्जर यांनी होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठीच्या सोलापूरकरांच्या तीव्र भावनांविषयी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासमवेत यशस्वी बैठक केली. तसेच, कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव, गणेश पेनगोंडा आणि रोहित मोरे यांच्यासमवेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या मुंबई येथील मुख्यालयात झालेल्या बैठकीत सर्व विषय समजून घेऊन सदर विषय राज्यसभेत उपस्थित केला. सोलापूर विकास मंचच्यावतीने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी सगळ्या आंदोलनात मी सक्रियपणे व्यक्तीगत हजर असेन, असेही युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज यांनी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना आश्वस्त केले.