‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चा दणका!; निवडणूक आचारसंहिता धाब्यावर बसवून विनापरवाना प्रचार केल्याप्रकरणी गुंजाळा येथील सरपंचपदाच्या उमेदवारावर गुन्हे दाखल!
– उमेदवारीदेखील आली धोक्यात?
चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील गुंजाळा गावात निवडणूक आचारसंहिता धाब्यावर बसविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने काल उघडकीस आणला होता. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली होती. गुंजाळा गावात सरपंचपदाच्या उमेदवारानेच निवडणूक अधिकार्यांची कोणतीही परवानगी न घेता, वाहनांवर लाउडस्पीकर, एलईडी स्क्रीन लावून राजेरोसपणे प्रचार केला. याबाबतचा व्हिडिओच ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित केला होता. या घटनेची चिखलीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी डॉ. अजितकुमार येले व निवडणूक विभागाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित उमेदवाराविरोधात कोणत्याही दबावाला बळी न पडता, काल रात्री अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. चिखलीचे विस्तार अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी याप्रकरणात फिर्यादी झाले आहेत. सरपंचपदाच्या उमेदवार सौ. अरूणा सुनील केदार यांच्यासह दोन वाहनांचे चालक यांच्याविरोधात निवडणूक विभागाने गुन्हे दाखल केले असून, अधिक तपास अंढेरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अच्युतराव सिरसाठ हे करत आहेत. पोलिसांनी संबंधित वाहने ताब्यात घेतलेली आहे.
गुंजाळा गावात सरपंचपदाच्या उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, दिनांक १५ डिसेंबर २०२२ रोजी रात्री साडेआठ ते १० वाजेच्या दरम्यान वाहनांवर माईक, लाउडस्पीकर, एलईडी स्क्रीन लावून जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे गावात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. याबाबतचा एक व्हिडिओच काही जागृक ग्रामस्थांनी काढून, तो विश्वासर्ह डिजिटल प्रसारमाध्यम असलेल्या ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’कडे पाठवला होता. तसेच, याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनादेखील कळविण्यात आले. त्यामुळे परवा रात्रीच निवडणूक विभागाचे अधिकारी, व पोलिस हे गुंजाळा गावात दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. तसेच, हे प्रकरण मिटविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून मोठा दबावदेखील निर्माण करण्यात आल्याचे दिसून आले. परंतु, कोणत्याही दबावाला बळी न पडता कर्तव्यदक्ष तहसीलदार तथा तालुना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजितकुमार येले यांनी नियमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार, निवडणूक अधिकारी तथा चिखलीचे विस्तार अधिकारी विलास राजाराम अंभोरे (वय ५०) यांनी निवडणूक विभागाच्यावतीने सरपंचपदाच्या उमेदवार सौ. अरुणा सुनील केदार (रा. गुंजाळा) यांच्यासह वाहन क्रमांक एमएच २८, बीबी ३६३९ व वाहन क्रमांक एमएच २८ एबी ३५५६ यांच्या चालकांविरोधात अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी कायमी अप नं. ३८४/ २०२२ कलम १८८ भादंवि ३३(ह) १३१, मपोअ १९५१ २३२, १७७ मोवाका १९८९ अनुसार दिनांक १६ डिसेंबररोजी रात्री ८ वाजता गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सरपंचपदाच्या उमेदवार सौ. अरूणा सुनील केदार, रा. गुंजाळा यांनी आचारसंहिता भंग करून कोणतीही परवानगी न घेता लाऊडस्पीकरद्वारे मतदार यांना आमिष देत होते, असा आरोप सरकार पक्षाने ठेवलेला आहे. संबंधित वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून, या घटनेचा व्हिडिओदेखील पुराव्याकामी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सरपंचपदाच्या उमेदवारांची उमेदवारीदेखील धोक्यात येऊ शकते, असे काही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
—————–