परवानगी द्या, अगर नका देऊ; मोर्चा तर काढणारच!
महाराष्ट्रातील तमाम जनतेने महामोर्चात सहभागी व्हावे – अजित पवार
– महामोर्चाच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीची बैठक
– परवानगी मिळाली नाही तरी मोर्चा काढण्यावर सर्व पक्ष ठाम
मुंबई (प्राची कुलकर्णी) – सतत महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य आणि गरळ ओकण्याचे काम थांबायला तयार नाही. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, हा मोर्चा राजकीय पक्षाशी निगडित नसल्याने या महामोर्चाला राज्यातील सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले. आज महामोर्चाच्या आढाव्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे पार पडली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी सत्ताधार्यांना चांगलेच धारेवर धरले. काल दिल्लीत झालेल्या दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीवरूनही जोरदार निशाणा साधला. ‘कालच्या बैठकीत नवीन काय झालं? कालच्या बैठकीत पोहे खाण्यासाठी गेले होते का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला. तर अजित पवार म्हणाले, की महापुरुषांचा सतत केला जाणारा अपमान, सीमा प्रश्न व महागाई, बेरोजगारी हे सर्व प्रश्न घेऊन सत्ताधारी लोकांचा धिक्कार करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि जनताही मोठ्याप्रमाणावर सहभागी होणार आहेत. ज्यांचा पक्षाशी संबंध नाही परंतु स्वाभिमान दुखावला गेला आहे असेही लोकं सहभागी होतील, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. अत्यंत समंजस भूमिका सर्व पक्षांनी घेतली आहे. अनेक राजकीय पक्ष त्यात सहभागी झाले आहेत. ज्या – ज्या वेळी बैठका घेण्यात आल्या त्या – त्या वेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. आजच्या बैठकीत मोर्चाचा आढावा घेण्यात आला. तिथे शिस्त राहिली पाहिजे. तिथे कुठेही काहीही विध्वंसक होणार नाही. अतिशय शांततेच्यामार्गाने लोकशाहीत आपले मत प्रदर्शित करताना मोर्चा काढतो त्याचपध्दतीने हा मोर्चा काढणार आहोत, असेही अजित पवार म्हणाले.
आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विनियोजन बिलासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत घेतलेल्या बैठकीबाबत काय ठरले, त्या बैठकीतून काय मार्ग निघाला याची विचारणा केली. त्यावेळी त्यांनी दोन्ही राज्यांनी शांतता ठेवावी. महाराष्ट्रातून तीन मंत्री आणि कर्नाटकचे तीन मंत्री अशी सहा लोकप्रतिनिधींची समिती राहिल आणि अधिकार्यांची एक समिती राहणार आहे, असे सांगितले. कर्नाटकची बाजू सुप्रीम कोर्टात अॅड. रोहतगी मांडणार आहेत हे समजल्यावर आम्ही ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांना महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडावी, अशी मागणी करणारे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात दिले व मुख्यमंत्री यांनाही पत्र दिले आहे. आपली बाजू सुप्रीम कोर्टात चांगल्या पद्धतीने मांडणे ज्यामुळे त्या भागात राहणार्या मराठी भाषिक लोकांची आग्रही मागणी आहे, आणि महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे. बेळगाव, कारवार, निपाणी हे आपल्यात आले पाहिजे अशा पध्दतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवले आहे. दोन्ही राज्यांनी समंजस भूमिका घ्यावी, शिवाय विरोधी पक्षांनीही घ्यावी त्यात तिन्ही पक्षाचा उल्लेख अमित शहा यांनी केला. आम्ही पहिल्यापासून राजकारण करायचं नाही अशी आमची भूमिका राहिली आहे, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘हीच वेळ आहे जागे होण्याची’ आणि या महामोर्चात सहभागी होण्याची अशी हाक तमाम महाराष्ट्र प्रेमींना दिली. शिवाय, सीमावादावर जी बैठक झाली त्या बैठकीत नवीन काय घडले असा सवाल करतानाच हा वाद ट्वीटने १५ – २० दिवस चिघळत असताना खुलासा करायला इतका वेळ का लागला आणि हा खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता, असा रोखठोक प्रश्न उपस्थित केला.
या बैठकीला माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, मुंबई अध्यक्ष आमदार भाई जगताप, काँग्रेसचे नेते नसीम खान, शिवसेना आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेना आमदार सचिन अहिर, माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रईस शेख, माकपचे प्रकाश रेड्डी, सीपीआयचे मिलिंद रानडे, शेकापचे राजू कोरडे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, माजी आमदार विद्याताई चव्हाण आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेला घाला घालण्याचा, आमच्या दैवतावर बेताल वक्तव्य करण्याचा प्रयत्न झाला. परवानगी द्या अगर नका देऊ मोर्चा काढणारच – अजित पवार
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांचा राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांनी केलेला अपमान व महाराष्ट्रातील गावे गिळंकृत करण्याचे कर्नाटकचे धोरण याविरोधात मुंबईत विराट मोर्चा काढण्याची हाक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह महाविकास आघाडीत सहभागी राजकीय पक्षांनी दिलेली आहे. परंतु, या मोर्चाची परवानगी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असलेल्या पोलिस विभागाने अडवून ठेवलेली आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार हे चांगलेच संतप्त झाले असून, तुम्ही परवानगी द्या किंवा देऊ नका, आमच्या महापुरुषांचा अपमान झालेला असल्याने आम्ही मोर्चा तर काढणारच, असे पवारांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला ठणकावून सांगितले. दरम्यान, आंदोलन करण्याचा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणारच, असा निर्धार खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. महापुरुषांचा अपमान होऊनही राज्यपालपदावरुन कोश्यारींनी हटवले नाही ना, मग आता विरोधक आंदोलक करणारच, असे राऊत म्हणाले.
पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, की अशा राजकीय मोर्चाला पोलीस परवानगी देत नाहीत. सरकार कुणाचेही असले तरी असे मोर्चे येतात त्यांना परवानगी दिलेली नाही हे माझ्या ऐकीवात नाही. लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. परवानगी मागण्याचा अधिकार आहे, परवानगी नाकारण्याचा अधिकार त्यांचा अधिकार आहे. परंतु आम्ही मोर्चा काढणार आहे. आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेला घाला घालण्याचा, आमच्या दैवतावर बेताल वक्तव्य करण्याचा प्रयत्न झाला. व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून, मंत्र्यांकडून अपमान झाला आहे. महापुरुषांचा होणारा अपमान, शिवाय सीमा प्रश्न आहे आणि महागाई, बेरोजगारी हे प्रश्न जनतेला सतावत आहेत त्यामुळेच महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे. आम्ही मोर्चा हा काढणार आहोतच असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.
संजय राऊत यांनी उपस्थित केला सवाल
महाराष्ट्रात अनेक विषय गंभीर आहे. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या आमच्या दैवतांचा अपमान घटनात्मक पदावर बसलेला व्यक्ती खुलेआम करत आहे. याचे सरकारकडून समर्थन करण्यात येत आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. Dााम्ही मोर्चा काढू नये, असे सरकारला वाटत होते तर मग राज्यपालांना हटवायला हवे होते. तसेच जे प्रवक्ते बडबडत आहेत, त्यांच्यावर कारवाई करायला हवी होती. का केली नाही, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीच्या महामोर्च्यात शिवसेना ठाकरे गटाची ताकद दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईतील प्रत्येक शाखेतून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक शाखेत मोर्चाबाबतची भूमिका समजावून सांगितली जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकी आधी शिवसेना ठाकरे गट मुंबईतील आपली शक्ती मोर्च्याच्या माध्यमातून दाखवून देणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, गटप्रमुख याबाबत नियोजन करत आहेत. क्रुडास कपंनी ते टाइम्स इमारत मोर्चा निघणार आहे. टाइम्स इमारत शेजारी भव्य स्टेज उभारले जाणार असून यावरुन प्रमुख नेत्यांची भाषणे होणार आहेत.
————–