साेलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्ह्यातील गायरान जमिनी या कायम करावा यासाठी 2018 रोजी जिल्ह्यातून 47 हजार प्रस्ताव प्रत्येक गाव पातळीवर प्राप्त झाले होते. परंतु त्यापैकी केवळ 9 हजार अतिक्रमित गायरान जमिन कायम करण्यात आले आहेत. उर्वरित जवळपास 38 हजार गायरान जमिनी कायमच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या जमिनी त्वरित कायम करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे गावठाण जमीनी निवासी वापरासाठी अपुऱ्या पडत असल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गायरान जमिनीवर निवासाच्या गरजेपोटी स्थानिक ग्रामस्थांनी कच्च्या पक्क्या स्वरुपात निवास केलेला आहे. गायरान जमिनीचा निवासी प्रयोजनाचा वापर नियमित करण्याचे शासनाचे धोरण आहे. या जमिनी कायम करावी यासाठी शासनाचे परिपत्रक असताना देखील झेडपीच्या अधिकाऱ्याकडून याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गायरान जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी झालेली सर्व अतिक्रमणे 31 डिसेंबर, 2022 पर्यंत नियमानुकुल करण्याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास सरपंच परिषदेच्यावतीने 2 जानेवारीपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सरपंच परिषदेचे राज्य सरचिटणीस अँड. विकास जाधव, जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, जिल्हा समन्वयक विकास माने, तालुका अध्यक्ष करमाळा डॉ. अमोल दुरंदे, रूपाली नवले आदी उपस्थित होते.