सोलापूर (संदीप येरवडे) – लंपी आजार येऊन आज साडेतीन महिने झाले तरी हा आजार आटोक्यात येणे कठीण झाले आहे. त्यामुळे दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणार्या सोलापूर जिल्ह्याला लंम्पी आजाराचा विळखा पडला असून, पशुधनाचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे.
ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून पशुधनाचा सांभाळ केला जातो. या पशुधनाच्या माध्यमातून शेतकर्यांना चार पैसे दूध विक्रीतून मिळतात. परंतु लम्पी आजारामुळे जनावरांचा मृत्यू होत आहे. शिवाय दुधाच्या उत्पन्नामध्ये देखील घट होत आहे. याचा आर्थिक फटका पशुपालक शेतकर्यांना बसत आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या लम्पी आजाराने जवळपास २८ हजार ४१३ जनावरांना याची बाधा झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने गाय, गाईची वासरे, बैल आदी वर्गाचा समावेश आहे. इतर जनावरांना हा आजार फारसा त्रासदायक नाही. लाख रुपयाच्या घरात घेतलेली दुधाळ गाय शेतकर्याच्या नजरेसमोर जीव सोडत आहे. कोरोनाप्रमाणे लम्पी आजार देखील जनावरांना बाधित केल्यामुळे जिल्ह्यातील पशुधन धोक्यात आले आहे. अगोदरच जिल्हा पशुधन विभागाकडे जनावराच्या डॉक्टरांची कमतरता आहे. अशांमध्ये लम्पी आजाराने धुमाकूळ घातल्याने पशुपालकांची अक्षरशः झोप उडाली आहे.
– एकूण बाधित जनावरे – २८,४१३
– बरे झालेले – १९,८५०
– मृत – २२७१
– सध्या बाधित – ६२९२
– एकूण लसीकरण ७ लाख ४० हजार
– अनुदान दिलेले २ कोटी ८५ लाख ९६ हजार
शासनाच्या आदेशाप्रमाणे लंम्पी हा आजार आटोक्यात आणण्यासाठी आमच्या स्तरावर आम्ही जिल्हाभर प्रयत्न करीत आहोत. त्यामध्ये काही प्रमाणात यशदेखील येत आहे.
– डॉ. नवनाथ नरळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
—————–