प्रांताधिकारी भूषण अहिरेंच्या कारवाईने वाळूतस्करांचे धाबे दणाणले!
– एक कोटी ३६ लाखांचा दंड, ५ बोटी, २ पोकलॅण्ड, दोन टिप्परसह ५४० ब्रास वाळू जप्त
चिखली/सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी धडाकेबाज कारवाई करत, तब्बल पाच वाळूतस्करांची वाहने जप्त करत त्यांना एक कोटी ३६ लाखांचा दंड ठोठावल्याने वाळूतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तर कारवाईतून सुटका मिळविण्यासाठी व वाहने परत मिळविण्यासाठी काही वाळूतस्करांनी महसूल प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचेही दिसून येत आहे. तथापि, प्रांताधिकारी अहिरे यांच्या कारवाईबद्दल मात्र सिंदखेडराजासह देऊळगावराजा तालुक्यातूनही कौतुकाचा वर्षाव होत असून, महसूल प्रशासनाने कुणाच्याही दबावाला बळी न पडता कारवाई सुरूच ठेवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यांतून वाहणारी खडकपूर्णा नदी वाळूतस्करांनी पूर्णपणे पोखरली असून, त्यांना महसूलच्याच काही अधिकार्यांचा वरदहस्त असल्याचा संशय निर्माण झालेला आहे. त्यामुळे हे वाळूचोर बेफाम झालेले असून, ते राजेरोसपणे शासनाला कोट्यवधीचा चुना लावून पर्यावरण व शेतीला धोका निर्माण करत आहेत. या वाळूतस्करांना सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी १२ डिसेंबररोजी चांगलाच दणका ठेवून दिला होता. त्यांनी अचानक छापे घालून वाळूतस्करांच्या वाहनांसह अवैध वाळू जप्त केली होती. त्यांनी केलेल्या कारवाईत ज्ञानेश्वर वाघ, गट नं ३८१ मध्ये १०० ब्रास अवैध वाळू दंड १५ लाख ६० हजार, १ बोट दंड ५ लाख, २ टिप्पर दंड ४ लाख रुपये, मंदाकिनी अरविंद पराड गट नं ४४० मध्ये
८० ब्रास अवैध वाळू दंड १२ लाख ४८ हजार, ओम पराड यांची बोट दंड ५ लाख रुपये, मनेश वाघ गट नं.७५ १२० ब्रास अवैध वाळू दंड १८ लाख ७२ हजार, १ बोट दंड ५ लाख, संजय शंकर पराड गट नं ८१ मध्ये १४० ब्रास अवैध वाळू दंड २१ लाख ८४ हजार, भरत संजय पराड यांची १ बोट दंड ५ लाख, १ पोखलण्ड दंड ७.५ लाख रुपये, भास्कर महादेव लाड गट नं ४४७ मध्ये १५० ब्रास अवैध वाळू दंड २३ लाख ४० हजार, रवी लाड यांची १ बोट दंड ५ लाख, १ पोखलण्ड दंड ७.५ लाख रुपये असा एकूण ५ बोटी, २ पोकलण्ड, २ टिप्पर, व ५४० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. या सर्व वाळूतस्करांवर एकूण एक कोटी ३६ लाख दंडाचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या या कारवाईचे सर्वसामान्य जनतेतून प्रचंड स्वागत असून, वाळूतस्करांनी काही राजकीय नेत्यांच्या माध्यमातून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला असल्याची बाबही निदर्शनास येत आहे. तथापि, पोलिसांनी केलेली कारवाई योग्य असून, सातत्याने अशा कारवाया करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, ब्रेकिंग महाराष्ट्रने वाळूतस्करी प्रश्नी सुरूवातीपासून आक्रमकपणे आवाज उठवलेला आहे.
————————