ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघात, एसटी बस जळून खाक, समशेरपूरचे दोन तरुण ठार
नाशिक (जिल्हा प्रतिनिधी) – नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाका परिसरात ब्रेक फेल झाल्याने भरधाव एसटी बसने समोरील एका बससह दोन ते तीन वाहनांना ठोकरले. या विचित्र अपघाताने बसने पेट घेतला. या भयंकर अपघातात अकोले तालुक्यातील समशेरपूरच्या दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर काहीक्षणातच बस जळून खाक झाली. या बस अपघातात होरपळून मृत्युमुखी पडलेल्यांपैकी एकाचे नाव रवींद्र सोमनाथ विसे तर दुसर्याचे नाव मदन दिनकर साबळे असे असून ते बजाज पल्सर गाडीने नाशिककडे येत होते. दरम्यान, हे दोघेही युवक नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील समशेरपूर येथील रहिवासी असून, ते नाशिकला लग्नासाठी येत असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, कारचालक अचानक थांबल्याने पुढे असलेल्या एसटी बसवर मागून भरधाव आलेली एसटी बस ब्रेक झाल्याने धडकली. त्यात दोन ते तीन बाईक मध्ये अडकल्या. अपघातानंतर बसने पेट घेतला. पेट घेतलेली एसटी राजगुरू नगर आगाराची होती. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद महामार्गावर नांदूर नाकाजवळील मिरची हॉटेल चौकातदेखील असाच अपघात घडला होता. ट्रकने खाजगी बसला धडक दिली होती. अपघात झाल्यानंतर काही क्षणातच खाजगी बसने पेट घेतल्याने या १३ लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पुन्हा एकदा त्या अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस यंत्रणा व तपास यंत्रणांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, नाशिक-पुणे महामार्गांवर शिंदे पळशे गावाजवळील स्पीड ब्रेकरजवळ क्रेटा कारने वेग कमी करून जात असतांना तिच्यामागे सिन्नर आगाराची बस धावत होती. सिन्नर आगाराच्या बसच्या मागे तीन वेगवेगळ्या मोटार सायकल या धावत होत्या. याचवेळी पाठीमागील बाजूने भरधाव येणार्या राजगुरूनगर आगाराच्या बसने पुढील तिन्ही दुचाकींना जोरात धडक देऊन पुढे धावणार्या सिन्नर आगाराच्या बसच्या पाठमागील भागास धडक दिली. त्यामुळे सिन्नर आगार बसच्या पुढे धावणार्या क्रेटा कारला धडक दिली. याच सुमारास दोन मोटारसायकल राजगुरूनगर आगाराच्या बसच्या इंजिनच्या भागात घसरत घुसल्याने दुचाकीने पेट घेतला. त्यामुळे राजगुरूनगर आगाराच्या बसने पेट घेतला. त्यात प्राथमिक माहितीनुसार दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. तसेच तिन्ही दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. राजगुरूनगर आगाराची बसदेखील पूर्ण जळाली आहे. या अपघातात एक दुचाकीस्वाराचा पाय प्रâाक्चर झाला. तिसर्या दुचाकीस्वाराची अद्याप माहिती मिळाली शकली नाही. जवळपास २५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बिटको हॉस्पिटल नाशिक रोड, जिल्हा रुग्णालयात व सिन्नर येथे दाखल केले आहे. दरम्यान, अपघातातील जखमींना नाशिक १ आगार, नाशिक २ आगार व सिन्नर आगार मदत करत आहे.
—————–