महाराष्ट्रद्रोह्यांना आवरण्यासाठी मुंबईत हल्लाबोल मोर्चा!
– उद्धव ठाकरे यांचा पत्रकार परिषदेत राज्य, केंद्र सरकारवर हल्लाबोल
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे वक्तव्य असो की, कर्नाटक सरकारची अरेरावी, महाराष्ट्राला केंद्र सरकार, कर्नाटक आणि उद्योग पळवण्यात हातभार लावणारे राज्यातील सरकार असो, हे सर्व महाराष्ट्रद्रोहीच आहे. या सर्वांविरोधात १७ डिसेंबरला आमचा मोर्चा आहे. वेळेत महाराष्ट्रद्रोह्यांना आवरले नाही तर ते महाराष्ट्र छिन्नविछिन्न करायला मागे पुढे पाहणार नाही, असा घणाघात शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. यासह विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजपवर हल्लाबोल केला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, छगन भुजबळ, रईस शेख, कपिल पाटील, डाव्या पक्षांचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते पत्रकार परिषदेला उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, की महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यातील सीमाभागातील गावांवर दुसर्या राज्यांकडून दावा केला जात आहे. मुंबईदेखील तोडण्याचा डाव केला जात आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.
कर्नाटकच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते आपली गावे तोडण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. तर अजित पवार म्हणाले, की मराठी भाषिकांवर कर्नाटकच्या कन्नड वेदिकेकडून अत्याचार होत आहेत. भाषावार प्रांतरचना असतानाही मराठी भाषिकांवर अन्याय आणि दडपशाही केली जात आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरण असतानाही कर्नाटकचे मुख्यमंत्री प्रक्षोभक भाषणे करीत आहेत. महाराष्ट्राबद्दल अस्मिता बाळगणारेच फक्त यावर आवाज उठवत आहेत, असे सांगून आजच्या बैठकीचा हेतू अजित पवार यांनी सांगितला. परवाची बैठक धावपळीत झाली, मोजकेच लोकं उपस्थित होते, आज मविआचे सर्व घटक पक्ष उपस्थित आहेत. १७ तारखेला महाराष्ट्रद्रोही लोकांच्या विरोधात महामोर्चा जिजामाता भोसले उद्यान ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा होईल.