आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी, केळगाव, मरकळ, चऱ्होली पंचक्रोशीतील विविध श्री गुरु दत्त मंदिरात श्रीगुरुदत्त जयंती निमित्त धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक उपक्रम, पूजा, विधी, श्री जन्मोत्सवाच्या पाळणा, यज्ञयाग, आरती, गायन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम झाले. मंगलमय धार्मिक वातावरणात दत्त जयंती उत्सव हरिनाम गजरात साजरा झाल्याचे श्री रघुनाथबाबा समाधी मंदिर दत्त मंदिराचे व्यवस्थापक कलायन महाराज कल्याणकर यांनी सांगितले.
आळंदी येथील वीज महावितरण कार्यालय, आळंदी पोलीस ठाणे, चऱ्होली रस्त्या वरील दत्त मंदिर, श्री वाघमारे दत्त मंदिर, श्री वरखडे दत्त मंदिर, श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज मठ, श्री रघुनाथ बाबा समाधी मंदिर दत्त मंदिरात स्वामी ज्ञानानंद सरस्वती महाराज यांचे मार्गदर्शनातं झाले. केळगाव, मरकळ परिसरात ताई माऊली आश्रमातील दत्त मंदिरातही धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात झाले. चऱ्होली रस्त्यावरील दत्त मंदिरात श्रींचे गाभाऱ्यातील दत्त जयंती निमित्त लक्षवेधी फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात आळंदी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सुरेश भोसले, वीज महावितरणचे कार्यालयात सुभाष धापसे, अरुण बडगुजर, अजित घुंडरे, नंदकुमार वडगावकर तसेच सचिन घुंडरे यांचे घरासमोर श्रींचे प्रतिमेचे पूजन करून लक्षवेधी पुष्प सजावट करीत प्रसाद वाटप पूजा झाली. यावेळी उपस्थितांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी श्रींचे जन्मोत्सवा वर आधारित कीर्तनसेवा विविध ठिकाणी झाली. ह. भ.प. बाळासाहेब महाराज शेवाळे, कल्याण महाराज कल्याणकर, प्रसाद महाराज माटे आदींनी कीर्तन, प्रवचन सेवा रुजू केली. आळंदी पोलीस ठाण्यात धार्मिक वातावरणात दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
केळगाव येथील श्री दत्त मंदिरात या वर्षी संघर्ष युवा प्रतिष्ठानचे वतीने दत्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सुश्राव्य कीर्तन सेवा दत्त जन्मोत्सवावर आधारित झाली. श्री रघुनाथ महाराज मंदिरात अभिषेक आरती, महाप्रसाद वाटप केळगाव गावठाण येथे उत्साहात झाले. यासाठी समस्त ग्रामस्थ केळगाव, हनुमान वाडी यांचेसह संघर्ष युवा प्रतिष्ठान खेड तालुका अध्यक्ष अमोल वीरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. येथील कासार धर्मशाळेतील श्री गुरु दत्त मंदिरात श्रींची महापूजा करण्यात आली. महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी सचिन सोळंकर, उद्योजक समीर गोरे, अमोल सोळंकर, अतुल सोळंकर, जितेंद्र सोळंकर आदींसह कासार समाज बांधव उपस्थित होते. श्रीक्षेत्र मरकळ (मारूतीनगर) ता.खेड येथील जागृत, पुरातन पंचलिंगमाळावरील दत्तमंदिरात टाळ-मृदंगाच्या गजरात श्री दत्त जन्मोत्सवाचे हरिकीर्तन दत्त जन्मोत्सवावर आधारित कीर्तन उत्साहात झाले. पंचलिंग गुरुदेव दत्त प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ह.भ.प.ताईमाऊली महाराज यांनी प्रवचन सेवा रुजू केली. श्री दत्तजन्म सोहळ्यासाठी पुणे, रायगड, कोकण, मुंबई येथील दत्तभक्त, भाविक मरकळच्या दत्तमंदिरात दर्शनास आले होते. भगव्या पताका, भगवे ध्वज,आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विविध रंगीबेरंगी फुलांची सजावट केल्यामुळे मंदिरे लक्षवेधी दिसत होते.
वारकरी भजन, दिंडी, नगरप्रदक्षिणा, दत्तभजन यांच्या सुमधुर आवाजाने मरकळ परिसर दुमदुमून गेला आहे. हरी ओम तत्सत् जय गुरुदत्त दत्त या मंत्राचा अखंड जप झंझाळ. ज्ञानेश्वरी व गुरुचरित्र पारायणाचे वाचन, जन्मोत्सवास दिपप्रज्ज्वलन करून सुरुवात करण्यात आली होती. दररोज काकडा आरती, नित्य आरती, पारायण, होमहवन, गाथाभजन, हरिपाठ, आरती, किर्तन, अन्नदान, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम झाले. मरकळ व परिसरातील नागरिक, आलेल्या भाविकांना अन्नदान करण्यात आले. काल्याचे किर्तनाने दत्तजयंती सोहळ्याची सांगता होत आहे. येथील श्री रघुनाथबाबा समाधी मंदिरातील दत्त मंदिर मठात दत्त महाराज जयंती पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वामी ज्ञानानंद सरस्वती महाराज यांचे मार्गदर्शनात ह.भ.प. कल्याण महाराज कल्याणकर यांचे प्रवचन हरिनाम गजरात झाले. यावेळी मंदिरात भजन, कीर्तन, नामजप असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात शेकडो भाविकांनी दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. यावेळी आरती आणि कीर्तन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर घुंडरे पाटील यांनी दिली. यावेळी शेकडो भाविकांना महाप्रसादाचे उत्साहात वाटप करण्यात आले.