चिखली (शहर प्रतिनिधी) – शेतातून परत येणार्या तरूण शेतकर्यासमोर अचानक चक्क दोन वाघ आले. त्यामुळे अक्षरशः गर्भगळीत झालेल्या या तरुणाने मोठ्या धाडसाने प्रसंगावधान राखत हातातील बॅटरी त्यांच्याकडे फेकून देत, जवळच्या झाडावर चढून आपले प्राण वाचवले. नंतर मोबाईलवरून ग्रामस्थांची संपर्क साधून, गावकरी आल्यानंतर तो सुखरूप घरी परतला. रायपूर येथील माळशेंबा शिवारात ही थरारक घटना घडली. या घटनेने शेतकरी प्रचंड घाबरलेले आहेत.
रायपूर येथील संतोष शिवाजी देवकर हा तरुण नित्यनेमाप्रमाणे दिवसभर शेतातील कामे आटोपून काल (दि.६) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घराकडे निघला असता, अचानक त्याच्या समोर दोन वाघोबा प्रगट झाले. साक्षात मृत्यू समोर उभा पाहून संतोष देवकर हा तरुण गर्भगळीत झाला. परंतु, प्रसंगावधान राखून त्याने हातातील बॅटरिक फेकून देऊन जवळच असलेल्या पिंपरीच्या उंच झाडावर चढून आपले प्राण वाचविले. दोन वाघ झाडाखाली तर संतोष हा झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसलेला. सूर्य मावळतीस गेलेला, चोहीकडे अंधार पसरत गेला, घाबरलेल्या परिस्थितीत त्याने स्वतःस सावरले व मोठ्या हिमतीने खिशातील मोबाईल काढून, जवळच्या शेतकरी मित्रांना मदतीसाठी याचना केली. ही खबर कानोकानी गावभर पसरली व घटनास्थळी अनेक नागरिकांनी धाव घेऊन त्याला खाली उतरवले व सुखरूप त्याच्या घरी घेऊन गेले. संतोषचे प्राण वाचले असले तरी त्याला या घटनेचा मानसिक धक्का बसलेला आहे. रायपूर गावाच्या शिवारातील माळशेंबा रस्त्यावर असलेल्या नबा पाटील यांच्या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या शेतात हा थरारक प्रसंग घडला. या घटनेमुळे शेतकरीवर्गात घबराटीचे वातवरण पसरले असून, वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.