मिसाळवाडी, कोनड, मुंगसरी, करतवाडी, सावंगी गवळी ग्रामपंचायती बिनविरोध!
– निवडणूक रणधुमाळी पेटली, गावकी-भावकीच्या प्रचाराचा जोर चढला!
– बहुचर्चित मिसाळवाडीच्या सरपंचपदी बाळू पाटील बिनविराेध
चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती. परंतु, आज (दि.७) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच ग्रामपंचायतींमधील सरपंच पदासह सदस्यांच्या जागेवरील अर्ज संबंधितांनी मागे घेतल्यानंतर, बहुचर्चित मिसाळवाडी ग्रामपंचायतीसह मुंगसरी, करतवाडी, सावंगी गवळी व कोनड या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित २३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली असून, उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. आता सरपंचपदासाठी ७९ तर सदस्यपदांसाठी २८६ उमेदवार निवडणूक मैदानात उरलेले आहेत. त्यामुळे या गावांत गावकी-भावकीच्या प्रचाराने जोर धरला असून, सर्वच गावांत चुरशीची निवडणूक होत आहे.
उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यानंतर आता लढतीचे खरे चित्र स्पष्ट झाले असून, निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे संबंधित गावांत आता प्रचाराचा धुराळा उडाला असून, गावकी-भावकीच्या राजकारणाने चांगलाच जोर धरलेला आहे. चिखली तालुक्यातील काही गावे ही सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघात येतात तर काही गावे ही चिखली मतदारसंघात येतात. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षचिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी, या निवडणुकांत आपलेच उमेदवार व सरपंच विजयी व्हावेत, यासाठी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे व आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनीदेखील जोरदार कंबर कसलेली आहे.
२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी १३२ तर सदस्य पदासाठी ४७५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सरपंचपदासाठी ४८ तर सदस्य पदासाठीचे १०५ अर्ज माघारी घेण्यात आलेत. त्यामुळे आता सरपंचपदासाठी ७९ तर सदस्य पदासाठी २८६ उमेदवार हे निवडणूक रिंगणात उरलेले आहेत. ज्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात त्यामध्ये बहुचर्चित व सर्वात प्रथम बिनविरोध होणारी मिसाळवाडी ग्रामपंचायतीसह मुंगसरी, करतवाडी, सावंगी गवळी, कोनड या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
इसरूळ ग्रामपंचायतीची निवडणूक सर्वाधिक चुरशीची होत असून, या ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी तब्बल १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर सदस्य पदासाठी १८ उमेद्वार निवडणूक रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये जिरवाजिरवीच्या व पाडापाडीच्या राजकारणाला उधाण आले असून, सरपंचपदी कोण विजयी होतो, याकडे संपूर्ण चिखली तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.
ग्रामपंचायत निवडणुका होत असलेल्या गावांचा सविस्तर तपशील व निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या असलेला सविस्तर तक्ता पहा. CamScanner 12-07-2022 19.04.29
मिसाळवाडी ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी, अशी गावातील प्रतिष्ठीत ग्रामस्थ, भूमिपुत्र यांची इच्छा होती. त्यानुसार, ही ग्रामपंचायत सरपंचपदासह बिनविरोध झाली असून, सर्वच राजकीय पक्षाच्या ग्रामस्थांनी अराजकीय भूमिकेतून ग्रामपंचायत बिनविरोध केलेली आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत कुणाही एका राजकीय पक्षाच्या ताब्यात गेलेली नाही. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामपंचायत व सरपंच बिनविरोध होण्याची प्रक्रिया सुरू असताना, सरपंच बाळू पाटील यांचा एक उचापतखोर कार्यकर्ता गावातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे विरोधी गटाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता होती. परंतु, सर्वांनी त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. आता ग्रामपंचायत बिनविरोध करताना सरपंच बाळू पाटील व प्रमुख विरोधक हनुमान मिसाळ यांनी संत गजानन महाराज यांच्या मंदिरात ग्रामस्थांना जे आश्वासन दिले आहे, त्याचे पालन करावे व गावाच्या विकासासाठी राजकारण करावे, असा सल्ला सर्वच ग्रामस्थ या दोघांना देत आहेत. झालेल्या राजकीय तडजोडीनुसार, सरपंचपद बाळू पाटील यांना पाच वर्षाकरिता देण्यात आले असून, उपसरपंचपद पहिल्या तीन वर्षाकरिता प्रमुख विरोधक हनुमान मिसाळ यांना व उर्वरित दोन वर्षे ही मागासवर्गीय समाजातील दाेन सदस्यांना प्रत्येकी एक वर्षे याप्रमाणे देण्याचे ठरले आहे. या आश्वासनाचे बाळू पाटील व हनुमान मिसाळ यांनी पालन करावे, व एकमेकांच्या जिरवाजिरवीचे राजकारण करू नये, असा सल्लाही या दोघांना देण्यात येत आहे.
गावातील ‘एक उचापतखोर व रिकामटेकडा कार्यकर्ता’ बाळू पाटील व हनुमान मिसाळ यांच्यात भांडणे लावून मजा पाहण्याचे काम करत आहे. तसेच, गावातील सलोख्याचे वातावरण खराब करत आहे. तसेच, तो गावातील प्रथितयश व प्रतिष्ठीत भूमिपुत्रांविषयीदेखील माघारी अपशब्द बोलत आहे. वास्तविक पाहाता, याच प्रतिष्ठीत भूमिपुत्रांनी गावाची ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला होता, व गावानेदेखील त्यांच्या म्हणण्याचा सन्मान केला आहे. जर निवडणूक झाली असती तर अतिशय चुरशीच्या निवडणुकीत कदाचित धक्कादायक निकाल लागला असता. त्यामुळे ”बाळू पाटील व हनुमान मिसाळ या दोघांनीही गावातील या उचापतखोर व रिकामटेकड्या कार्यकर्त्याचे न ऐकता एकदिलाने गावगाडा हाकावा. तसेच, गावाच्या विकासासाठी आपले लक्ष केंद्रीत करावे. कुणीही कुणाविरोधात तक्रारी किंवा जिरवाजिरवीचे राजकारण करू नये”, यात गावाची लाज जाते, तसेच दोघांचेही राजकीय नुकसान होईल. आता जिल्हाभरातील सर्वच राजकीय नेत्यांनी आपले कौतुक केले असून, तो गौरव कायम ठेवावा, अशी अपेक्षा जाणकार, ज्येष्ठ व प्रथितयश ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
——————-