– जन्मोत्सव सोहळा आयोजन समितीच्या नियोजन बैठकीत निर्णय
चिखली (विशेष प्रतिनिधी) – दरवर्षी मराठा सेवा संघ जिजाऊ सृष्टी सिंदखेडराजा येथे दि.१२ जानेवारीरोजी आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करीत असते, या सोहळ्याला महाराष्ट्र राज्यासह, संपूर्ण भारतातील तसेच जगभरातील जिजाऊभक्त सहभागी होत असतात. गेली दोन वर्षे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा कोरोनाच्या गर्तेत सापडला होता. परंतु या वर्षी संपन्न होणारा १२ जानेवारी २०२३ जन्मोत्सव भव्यदिव्य स्वरुपात संपन्न होणार असून, त्यासाठी जन्मोत्सव सोहळा आयोजन समितीची पूर्वतयारीची पहिली नियोजन सभा रविवारी जिजाऊसृष्टी सिंदखेडराजा येथे संपन्न झाली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवश्री सुभाषराव कोल्हे व्यवस्थापकीय अध्यक्ष जिजाऊ सृष्टी, तर प्रमुख उपस्थितीत आनंदराव चनखोरे, शाहिर पाटील सांगली, रविंद्र चेके, धनंजय पाटील जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ औरंगाबाद, योगेश पाटील जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, प्रा.योगेश्वर निकस वाशिम, अॅड.निशीकांतराजे जाधव, प्रशांत तेलगड जालना धोरण यांची होती. या सभेमध्ये जन्मोत्सव सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने मैदान साफसफाई, वाहनतळ, निवासव्यवस्था, प्रचारप्रसार रथ, विचारपीठ जिजाऊसृष्टी, शिवधर्मपीठ जन्मस्थळ, राजवाडा परिसर, मंडप, लायटिंग साउंड, ४०० सहित्याचे स्टॉल, २०० भोजन स्टॉल उभारणे, कृषी झोन उभारणे सिस्टीम, ऑडिवो व्हिडीओ, एल एडी स्क्रिन, संपूर्ण सोहळ्याचे प्रक्षेपण आदींबाबत चर्चा करण्यात येऊन कंत्राटदार व कार्यकर्ते नियोजन ठरविण्यात आले, व पुढील नियोजन केंद्रीय कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली होईल. या सभेला संजय विखे, विलासराव तेजनकर, एस.पी.संबारे, विनोद बोरे, ए.एस.शेख, अॅड. कैलास शेळके, बी.एस वडकिले जिल्हा सचिव औरंगाबाद, सागर खांडेभराड, राजेश मंडवाले, सागर खेळकर, भारत कदम आदी उपस्थित होते. सभेचे संचलन विवेक काळे यांनी तर आभार योगेश पाटील यांनी मानले.
——————