KARAJATPachhim Maharashtra

वीज वितरण कार्यालयात जाऊन आ. पवारांनी अधिकारी धरले धारेवर!

कर्जत (प्रतिनिधी)- लोकांच्या तक्रारी, महावितरणवर आरोप, लोकहितासाठी इशारा, वेळप्रसंगी आ. रोहित पवार यांचा गर्भित दम, आक्रमक कार्यकर्ते व समर्पक उत्तरे देतानाच अनेकदा निरुत्तर झालेले वितरणचे अधिकारी असे काहीसे चित्र काल आ. रोहित पवार यांच्या वीज वितरण कार्यालयाच्या भेटी प्रसंगी पहावयास मिळाले.

राज्याचे नेते शेतकर्‍याच्या विजेसंदर्भात उलट सुलट प्रतिक्रिया देत असताना कर्जत तालुक्यातील शेतकर्‍याची वीज कट केली जात आहे, वीज वितरण बाबत शेतकरी अनेक तक्रारी करत आहेत, काही कर्मचारी मनमानी करत आहेत अशा अनेक तक्रारी मुळे आ. रोहित पवार यांनी कार्यकर्त्यासह वीज वितरण कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांना जाब विचारला. यावेळी शेतकर्‍याच्या वीज कट केले जात असून वीज बिल भरण्याबाबत नेमका जीआर काय आहे? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर महावितरणचे अभियंता कैलास जमदाडे यांनी तीन महिन्याचे चालू बिल भरणे आवश्यक असल्याचे सांगीतले.

तालुक्यात अनेकांच्या तीन एचपीची मोटर पाच एचपी करण्यात आली आहे, असा आरोप करताना सद्या सत्ताधार्‍यांकडून रोजच्या उठवल्या जाणार्‍या वावड्या खोट्या आहेत, पैसे तर आपण घेत आहात मग वीज का देत नाहीत, एक दिवसाआड वीज देण्याचा नियम केला मात्र आठवड्यातील तीन दिवस ही विज का मिळत नाही, शेतकर्‍यांच्या अडचणी तुम्ही समजून घेत आहात का? आठ तास पूर्ण दाबाने विज द्या, आठ तासांत बावीस वेळा लाईट गेली, दिवसा विज का मिळत नाही, यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी महावितरणचे अधिकारी आणि ऑपरेटर फोन उचलत नसल्याचे आ रोहित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. महावितरणमध्ये एजंटगिरी सुरू असून पैसे दिल्यास तात्काळ रोहित्र बसविले जाते. अनेक वायरमन यांनी मध्यस्त नेमले आहेत यावर महावितरणचे कैलास जमदाडे यांना उत्तर देता देता नाकीनऊ आले होते. कुणी व्हिडिओ काढून दमदाटी करून, शिवीगाळ करत काम करत असल्याचे दाखवत असेल व आपण त्यांना भित काम करत असाल तर आम्ही असे हजार व्हिडिओ दररोज काढू शकतो तसे करायला मी सांगू का? असा सवाल उपस्थित करत आ. रोहित पवार यांनी आम्ही संयमाने वागत आहोत आमचा अंत पाहू नका असा इशाराच वीज वितरण अधिकार्‍यांना देत धारेवर धरले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, विजय नाना मोढळे, अ‍ॅड सुरेश शिंदे, अशोकराव जायभाय, काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष सचिन घुले, माऊली सायकर, सुनील शेलार, भास्कर भैलुमे, भाऊ तोरडमल, सतीश पाटील, अभय बोरा, सचिन कुलथे, सुधीर जगताप आदी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


घुलेच्या पाठीशी पवार!

नगर पंचायतचे तीन कोटी रुपये वीज वितरणकडे कररुपी बाकी असताना आम्ही कारवाई करत नाहीत, मात्र वीज बिलासाठी वीज वितरण स्ट्रीट लाईटचे कनेक्शन बंद करत असल्याचा आरोप नगरसेवकांसह काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष सचिन घुले यांनी करत दादा तुम्ही आम्हाला थांबवत आहात म्हणून आम्ही गप्प आहोत, अन्यथा कुणीतरी व्हिडिओ काढत अन काम करून घेत असेल तर यांच्या मागे लागायला व आमचीही स्टाईल दाखवायला वेळ लागणार नाही, असा इशारा घुलेनी देताच आ. पवार यांनी सचिनराव तुम्ही तुमची स्टाईल दाखवाच मी तुमच्या मागे आहे असे म्हणत, सद्याच्या राजकीय वातावरणातही योग्य तो डाव साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!