KARAJATPachhim MaharashtraPolitical NewsPolitics

प्रवीण घुले भाजपात; समर्थक नगरसेवक मात्र काँग्रेसमध्येच!

कर्जत (तालुका प्रतिनिधी) – कर्जत-जामखेड़ मतदारसंघात प्रवीण घुले यांनी घेतलेल्या भाजपा प्रवेशाच्या व काँग्रेस सोडण्याच्या निर्णयानंतर कर्जत नगरपंचायतमध्ये असलेले काँग्रेसचे तीन नगरसेवक कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. या तिघांनीही काँग्रेस पक्षामध्येच राहणार असल्याचे ठामपणे सांगितल्याने चर्चेला उधाण आले आहे.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाड़ीला भरघोस यश मिळाले, राष्ट्रवादीचे बारा तर काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले. हे तिन्ही नगरसेवक घुलेना मानणारेच आहेत. कर्जत नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी असून, प्रवीण घुले यांच्या भावजयी रोहिणी सचिन घुले या उपनगराध्यक्षा आहेत. त्यामुळे घुलेच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयात या तिन्ही नगरसेवकांची भूमिका काय, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. प्रवीणदादा घुले मित्रमंडळाच्या बैठकीला या तिन्ही नगरसेवकांची अनुपस्थिती होती, त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, नगरसेविका मोनाली तोटे व नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल यांना विचारले असता या तिघांनीही आम्ही काँग्रेसमध्ये होतो व काँग्रेसमध्येच राहणार आहोत, असे ठामपणे सांगितले.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत विजयानंतर आ. रोहित पवार यांनी अत्यंत चलाखीने काँग्रेसला आपल्या नगरसेवकांबरोबर नेत एकत्र १५ नगरसेवकांची गट नोंदणी केली होती. त्यावेळी काँग्रेस पक्ष म्हणून जर तीन नगरसेवकांचा गट केला गेला असता तर आज या तिघांची अडचण झाली नसती. मात्र एकत्र गट नोंदणीमुळे तांत्रिकदृष्ट्या या तिघांना काँग्रेसमध्येच राहणे क्रमप्राप्त असून, यामध्ये कर्जत तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते प्रवीण घुले यांच्याबरोबर भाजपवासी होणार असताना, त्यांच्या घरातीलच तिन्ही नगरसेवक मात्र काँग्रेसमध्येच राहणार आहेत. याबाबत प्रवीण घुले यांना विचारले असता, नगरपंचायतमधील नगरसेवकांबरोबर आपली चर्चा झालेली नाही, तालुक्यातील मित्रमंडळाच्या आग्रहास्तव आपण निर्णय घेतला. त्यामुळे शहरातील लोकप्रतिनिधी असलेले नगरसेवक त्याचा निर्णय घेतील, असे म्हणत कर्जत तालुक्यात सध्या अनेकांची घुसमट कशा प्रकारे सुरू आहे, हे विशद करतांना तालुक्यात मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळण्यासाठी आपल्याला निर्णय घ्यावा लागला. लवकरच आपण भाजपमधील ज्येष्ठांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेऊन अत्यंत जोमाने काम करणार आहोत. तालुक्यात सुरू असलेल्या चुकीच्या गोष्टींना ताकदीने विरोध करणार असल्याचे प्रवीण घुले यांनी सांगितले. कर्जत तालुक्यात घुलेंच्या या राजकीय घडामोडीत त्याचे बंधू काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष सचिन घुले हे परदेशात असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याने त्याची काय भूमिका आहे हे समजू शकले नाही. मात्र युवक काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी कालच्या बैठकीत सहभागी असल्याने सचिन घुलेच्या प्रतिक्रियेकडे व भूमिकेकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिध्द विखे पाटील कुटुंबातही शालिनीताई विखे या काँग्रेसमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी भाजपची वाट धरत, खासदारकी मिळवली होती. तोच पॅटर्न कर्जतमध्ये घुले कुटुंबात राबविला जाऊ शकतो, असे राजकीय धुरीणांचे मत आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!