– वारंवार डीपी जळत असल्याने उपसरपंचांसह ग्रामस्थांची मोहीम
चिखली (विशेष प्रतिनिधी) – विद्युत तारांवर आकडे टाकून सुरु असलेली चोरटी वीजचोरी आणि घरात इलेक्ट्रिकच्या शेगड्या चालविल्या जात असल्याने विद्युत रोहित्रावर (डीपी) विजेचा भार पडून डीपी वारंवार जळते. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा बंद होतो. काही ठरावीक ग्रामस्थांमुळे अख्ख्या गावाला वेठीस धरले जाते. त्यामुळे गावकर्यांच्यावतीने साकेगावच्या उपसरपंचांनी वाजतगाजत विजेच्या शेगड्या जप्त करण्याची मोहीम आज राबविली. तसेच, आकडे टाकणे बंद करण्याचे आवाहन केले.
सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील मौजे साकेगाव येथे गेल्या दोन वर्षात आतापर्यंत तीन ते चार वेळेस डीपी जळाली आहे. सरपंच, उपसरपंच व गावातील जबाबदार ग्रामस्थांनी पाठपुरावा करून सकाळी डीपी जळाली, की सायंकाळपर्यंत महावितरणने डीपी फीट केली आहे. महावितरणचे गावाला चांगले सहकार्य मिळते. परंतु, गावातील काही ठरावीक ग्रामस्थ तारेवर आकडे टाकून वीजचोरी करतात. तसेच, घरात इलेक्ट्रिकच्या शेगड्या चालवतात. त्यामुळे डीपीवर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे उपसरपंचाच्या नेतृत्वात गावकर्यानी आज वाजत गाजत फेरी काढून इलेक्ट्रिकच्या शेगड्या जप्त केल्या. ग्रामस्थांनी हीटर व शेगडी चालवू नये, त्यामुळे सिंगल फेजवरची डीपी जळते, असे आवाहन महावितरणनेदेखील केले आहे. तसेच, गावाला वेठीस धरणार्या ग्रामस्थांवर यापुढे कठोर कारवाईचा इशारादेखील देण्यात आलेला आहे. तरी, गावातील लोकांनी तारेवर आकडे टाकणे, हीटर व शेगड्या चालवणे, असे उद्योग करू नये, असे आवाहन साकेगावच्या उपसरपंचांनी केलेले आहे.
——————–