– कृषी शास्त्रज्ञ, तज्ज्ञांनी साधला शेतकर्यांशी संवाद
चिखली (विशेष प्रतिनिधी) – विदर्भ शेती विकास संस्था चिखली तसेच सवणा येथील शेतकरी यांच्यावतीने आयोजित शेतकरी मेळावा व कृषी शास्त्रज्ञाचा सत्कार कार्यक्रमक काल (दि.२७) उत्साहात पार पडला. या प्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे सोयाबीन पैदास्कर डॉ. मिलिंद देशमुख ,कृषी विज्ञान केंद्र बुलढाणाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अनिल तारू व इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ मिलिंद देशमुख यांचे सोयाबीन पीक वाण विकसित करण्यासाठी असलेले योगदान खर्या अर्थाने सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांच्या जीवनात एक आर्थिक क्रांती घडवून आणणारे आहे. डॉ देशमुख यांनी सोयाबीन पिकाच्या जास्त उत्पादन देणार्या फुले संगम, फुले किमया आणि फुले दुर्वा या वाणाची निर्मिती केली आहे, कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रस येथून हे वाण प्रसारित झालेले आहे. या सर्व जातींचा विदर्भातील सोयाबीनच्या शेतीचे उत्पादन हे ३०-४० टक्क्यांनी वाढलेले दिसून येते, याचे सर्व श्रेय हे कृषी विद्यापीठ राहुरीला जाते, त्या अनुषंगाने सवणा येथे सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी डॉ देशमुख यांनी अतिशय सोप्या भाषेत उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले व शेतक-यांन सोबत त्यांनी संवाद साधला.
विदर्भातील शेतकरी व शेतीसमृध्दी विषयी बोलताना डॉ देशमुख सरांनी नव्याने नियुक्त झालेले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, यांचे संशोधक संचालक राहुरी येथे असताना बीज उत्पादन व शेतकरी उत्पादक कंपनी करार याचा शेतकरी व विद्यापीठ यांना झालेला फायदा अधोरेखित केला. त्याच बरोबर विदर्भातील शेतकरी वर्गाला नक्कीच डॉ शरद गडाख यांच्या कामाचा फायदा होईल असे प्रतिपादन केले. प्रसंगी खरा शेतकरी व शास्त्रज्ञ संवाद घडून आल्याचे दिसून आले, कार्यक्रम प्रसंगी सेवा निवृत्त वरिष्ट शास्त्रज्ञ डॉ बी. आर.पाटील, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ अनिल तारु, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परीषदेचे मा सदस्य विनायक सरनाईक, जिल्हा बिज प्रमानिकरण अधिकारी श्री. भागवत खरात, तालुका कृषी अधिकारी येवले साहेब व मंडळ कृषी अधिकारी श्री अनंता आंभोरे, ज्ञानेश्वर खरात व इतर मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम आयोजित करण्यात विदर्भ शेती विकास संस्था चिखलीचे संचालक तसेच राहुरी कृषी विद्यापीठ येथे कार्यरत असलेले डॉ. अनंत इंगळे यांचे मोलाचे योगदान मिळाले, त्यांच्या व सवना येथील शेतकरी यांचे वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला वाशीम, यवतमाळ, जालना अमरावती जिल्ह्यांतून शेतकरी उपस्थित होते. प्रसंगी आपण केलेल्या कामाचा म्हणजेच विद्यापीठाचा शेतकरी मित्रांना फायदा होतो आहे, तसेच शेतकर्यांच्या जीवनात समृध्दी घडवून येते आहे याचे खूप मोठे समाधान आहे, असे डॉ मिलिंद देशमुख सर यांनी व्यक्त केले व विदर्भ शेती विकास संस्था करत असलेले कार्य हे नक्कीच शेतीला एक नवी दिशा देत आहे, नक्कीच एक नवीन दिशा सोयाबीन शेतीला मिळालेली आपल्याला दिसून येत आहे. प्रसंगी उपस्थित शेतकरी मित्रांसोबत चर्चा केली असता ३०-४० टक्के उत्पादनात वाढ झाली असल्याने शेतकरी वर्ग समाधानी होतो आहे व एक नवी स्फूर्ती त्यांना मिळत असल्याचे त्यांनी व्यक्त केले.