साखरखेर्डाचे ठाणेदार आडोळे यांना स्प्रिंकलरच्या तोट्या चोरणार्या चोरट्यांनी दिले आव्हान; रातोरात २०० तोट्या लंपास!
चिखली (एकनाथ माळेकर) – साखरखेर्डा पोलिस ठाण्यापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावरील काटे पांगरी, वडगाव माळी, सायाळ या गावांतील शेतकर्यांच्या शेतात सुरू असलेल्या तुषार संचाने पाणी देण्याच्या स्प्रिंकलरच्या तोट्या चोरट्यांनी रातोरात लंपास केल्याने साखरखेर्डाचे ठाणेदार आडोळे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. रात्रीतून जवळपास दोनशे तोट्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. त्यामुळे आधीच विजेच्या लपंडावाने त्रस्त असलेल्या शेतकर्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. स्प्रिंकलच्या तोट्या चोरणार्या चोरट्यांचा पोलिसांनी ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी ऐरणीवर आली आहे.
साखरखेर्डा लवकरच नगरपालिका होण्याच्या मार्गावर असलेले शहर असून, या शहरातील साखरखेर्डा पोलीस स्टेशनपासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या काटे पांगरी, वडगाव माळी, सायाळ या गावांमध्ये सध्या शेती पेरणीचे काम सुरू आहेत, व शेतीला पाणी देण्याचे कामसुद्धा सुरू आहे. परंतु वडगाव माळी, सायाळा, काटे पांगरी येथे जेमतेम २०० स्पिंकलरचे तोट्या अज्ञात चोराने चोरून नेल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ वडगाव माळी, काटे पांगरी व सायाळा या गावांमध्ये उडाली आहे. आज शेतकरी अस्मानी आणि सुल्तानी संकटाशी लढत असतानाच, चोरट्यांनी या शिवारातील जवळजवळ २०० स्प्रिंकलरच्या तोट्या काढून नेल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यावर खूप मोठे संकट कोसळले आहे. वडगाव माळी येथील शालिग्राम पाटोळे, मनोहर पाटोळे, सायाळा येथील माजी सरपंच रामेश्वर आव्हाळे यांच्या शेतातील दहा तोट्या चोरांनी चोरून नेल्या आहेत. शालिग्राम पाटोळे यांच्या गट नंबर ४३, मनोहर पाटोळे यांचा ५९ गट नंबर मधून व अनिल परमेश्वर जाधव यांच्या शेतातूनसुद्धा चोरट्यांनी नवजलच्या तोट्या चोरून नेल्यात. त्यामुळे या शेतकर्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. चोरट्यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनलासुद्धा मोठे आव्हान दिले आहे. आता साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार आडोळे साहेब हे चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी होतात की नाही, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागून आहे. आज शेतकर्यांना शेतीसाठी वीजपुरवठा नाही, त्यामुळे शेतकरी हा तुषार सिंचनाच्या भरवश्यावर शेती करत आहे. परंतु चोरट्यांनी तुषार संचाचे जवळजवळ २०० तोट्या काढून नेल्याने या भागातील शेतकर्यांवर खूप मोठे संकट उभे राहिले आहे.
——————-