पर्यटन, सेवा, शिक्षण, आरोग्यसेवेचा धगधगता यज्ञकुंड चेतविणारे निष्काम कर्मयोगी पू. शुकदास महाराज!
निष्काम कर्मयोगी संत पू. शुकदास महाराजश्री यांचा आज ८०वा जन्मोत्सव सोहळा विवेकानंद आश्रम येथे साजरा होत आहे. यानिमित्त शुकदास माऊली व त्यांनी संस्थापित केलेल्या विवेकानंद आश्रमाच्या कार्यावर सौ. मधुमती कमलेश बुधवाणी यांनी टाकलेला प्रकाशझोत.
निष्काम कर्मयोगी संत पू. शुकदास महाराजश्री यांचा आज ८०वा जयंतीमहोत्सव हिवरा आश्रम, ता. मेहकर येथे साजरा होत आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी शुकदास महाराजश्रींनी १९६५ मध्ये विवेकानंद आश्रम या सेवाभावी संस्थेची स्थापना केली होती. स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीचा आदर्श त्यांनी गुरूदीक्षा म्हणून स्वीकारला, आणि त्यांच्या या अदृश्यातील गुरूनेही त्यांना साक्षात्कारी दर्शन देत, जनसेवेचा मार्ग दाखविला. या मार्गावरच आयुष्यभर वाटचाल करताना, त्यांच्या निश्चिल ध्येयातून विवेकानंद आश्रम ही संस्था जन्माला आली. आज ही संस्था हिवरा आश्रमसारख्या एका उजाड माळरानावरील नंदनवन ठरली आहे. दररोज हजारो पर्यटक, भाविक येथे येतात; नयनरम्य पर्यटनाचा आनंद लूटतात; महाराजश्रींच्या समाधीदर्शनाने कृतकृत्य होतात; आणि येथील सेवा, शिस्त, आदरतिथ्य पाहून हरखून जातात. पर्यटन, शेती, दीन-पीडितांची सेवा-सुश्रुषा, वैद्यकीय सहाय्य आणि शैक्षणिक संकुलातील ज्ञानदान या विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्यातून केवळ विदर्भच नाही तर राज्य-देशभर असंख्य जण लाभान्वित झाले आहेत. पू. शुकदास महाराजश्री हे कुशल धन्वंतरी होते. तब्बल पाच दशकांहून अधिककाळ त्यांनी रोग्यांची, शारीरिक व्याधीने जर्जर झालेल्या पीडितांची सेवा-सुश्रुषा केली. जीवांच्या सेवेत देवाची पूजा ते करत राहिले. समाधीस्थ झाल्यानंतरदेखील त्यांचे हे सेवाकार्य तितक्याच नेटाने सुरु आहे.
विवेकानंद आश्रमाने शिवउद्यान, विवेकानंद स्मारक, हरिहरतीर्थ यासारखी सर्वोत्तम अशी पर्यटनस्थळे विकसित केली आहेत. नैसर्गिक भूभाग आणि नदी, नाले, तलाव यांचा कुशलतेने वापर करून ही प्राचीन तीर्थे पर्यटनांत रुपांतरीत झालीत. आजरोजी हजारो पर्यटक व भाविक येथे येत आहेत. नौकायन, उद्यानांतील वनराईंचा आनंद, बागबगिच्यांत रमताना संसारिक तापाचा विसर पडावा, इतकी सुंदर व निसर्गसौंदर्याने नटलेली ही पर्यटनस्थळे आहेत. महाराष्ट्रातील जनमाणसाला येथील पर्यटनाने भुरळ पाडली आहे. पर्यटनासह आध्यात्मिक सुखाचा आनंदही विवेकानंद आश्रमात लाभतो. हरिहरतीर्थावरील हरिहराचे जागृत देवस्थान, पू. शुकदास माऊलींचे जागृत समाधीस्थळ येथे माथा टेकविल्यानंतर ईश्वरीय साक्षात्काराचा प्रत्येकाला अनुभव येतो. जीवाची भवदशा या ठिकाणी संपून जाते.
विवेकानंद आश्रमाच्या आरोग्य सेवेने एक देदीप्यमान वारसा जपला आहे. या वारशाची बीजे रामकृष्ण परमहंस यांच्या आदेशात रूजलेली आहे. ‘संन्याशाने खेड्यापाड्यात जाऊन रोगी, आणि व्याधीग्रस्तांची सेवा करावी’, असा आदेश रामकृष्ण परमहंस देवांनी विवेकानंदांसह संन्याशांना दिला होता. हाच आदेश शुकदास महाराजश्री यांनी शीरोधार्य मानला. त्यांनी आयुष्यभर अॅलोपॅथीसारख्या अतिप्रगत चिकित्सा पद्धतीद्वारे रुग्णसेवा तर केलीच. परंतु, त्यांच्या समाधीस्थ अवस्थेनंतर विवेकानंद आश्रम रुग्णसेवेचा हा यज्ञकुंड कायम धगधगता ठेवून आहे. विवेकानंद आश्रमाची धमार्थ आरोग्य सेवा दररोज सुरू असून, गावोगावी, वाड्या वस्त्यांवर जाऊन विविध शिबिरांद्वारे लोकांना वैद्यकीय सेवेचा लाभ दिला जातो. आश्रमातदेखील विविध शिबिरांद्वारे हजारो रुग्णांवर मोफत उपचार तर केले जातातच, शिवाय मोफत औषधी वाटपदेखील केले जाते. आतादेखील आजरोजी महाराजश्रींच्या जन्मोत्सवानिमित्त मोफत रोगनिदान शिबिर व औषधी वाटप पार पडत असून, नामवंत डॉक्टर्स आपली सेवा देत आहेत.
विवेकानंद आश्रमाला नर्सिंग कॉलेजची मान्यता मिळाली असून, त्यासाठी विवेकानंद रुग्णालयाचे भव्य स्वप्न लवकरच लोकसहभागातून साकार केले जाणार आहे. विवेकानंद आश्रमाचे स्वतःचे अद्ययावत रुग्णालय असावे, असे महाराजश्रींचे ध्येय होते. हे ध्येय राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी विवेकानंद आश्रमाने कोट्यवधी रुपयांची जमीन शासकीय रुग्णालयासाठी दानही दिली आहे. परंतु, शासनाचा कारभार तो शासनाचाच कारभार!; ग्रामीण रुग्णालय बांधून पूर्ण झाले पण तेथे वैद्यकीय सोयीसुविधाच देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हे ग्रामीण रुग्णालय मोठी अडचण ठरले आहे. आता विवेकानंद आश्रमच लोकसहभागातून भव्य विवेकानंद रुग्णालयाची उभारणी करत असून, त्यातून महाराजश्रींच्या ध्येयाची पूर्तता होईल, असा जनमाणसाला विश्वास आहे.
कोराडी जलाशयातील विवेकानंद स्मारक उद्यानासाठी विवेकानंद आश्रमाने आतापर्यंत तीन कोटी रुपये खर्च करून सर्वांग सुंदर असे विवेकानंद स्मारक उभे केले आहे. महाराष्ट्रातील पहिलाच असा हा अध्यात्मिक व पर्यटनीय प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी अजून एक ते दीड कोटींच्या लोकसहभागाची गरज आहे. आजरोजी शेकडो पर्यटक व भाविक विवेकानंद स्मारकाला भेट देत असून, कोराडी जलाशयातील नौकायनाचा आनंद लूटत आहेत. तसेच, विवेकानंदांच्या विचार, आदर्श आणि शिकवणुकीचा रसग्रहण करून स्वतःच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. विवेकानंद आश्रम ही केवळ सेवाभावी संस्थाच नाही तर ते जनसेवेचे केंद्र आहे. या संस्थेला रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आणि निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराजश्री यांच्या उत्तुंग कृतीशील विचारांचा वारसा आहे.
महाराजश्री आज समाधीस्थ असले तरी समाधीतील त्यांची ऊर्जा सेवेचा हा यज्ञकुंड धगधगता ठेवण्याची प्रेरणा आश्रमाच्या विश्वस्त व व्यवस्थापन मंडळाला देत आहे. शिक्षण, सेवा, आरोग्य, कृषी, पर्यटन आणि आध्यात्मिक उन्नती या मानवतेच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे देदीप्यमान कार्य आज विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून अहोरात्र सुरू असून, त्याची प्रेरणा व कर्तेकरविते अर्थातच समाधीस्थ महाराजश्री आहेत. महाराजश्री म्हणाले होते, ‘मी मरूच शकत नाही. शरीर फक्त तुमच्या दृष्टीआड होईल, माझे कार्य सुरूच राहणार आहे’. त्याची प्रचिती आज सर्वचजण घेत आहेत. आज ८० व्या जन्मोत्सवानिमित्त पू. शुकदास महाराजश्रींच्या या सेवा कार्याचा आढावा घेतानाच, त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करत आहोत.
(लेखिका या विवेकानंद विद्या मंदीर, हिवरा आश्रम येथे शिक्षिका असून, निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराजश्री यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणार्या विवेकानंद आश्रमाच्या सेवाव्रती आहेत. संपर्क ८३७८९८६१०४)
——————–