कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत शहरांमधून जाणारा अमरापूर ते भिगवन या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, व शहरातील व्यापारी बांधवांना धुळीच्या त्रासामधून दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन कर्जत शहर व्यापारी असोसिएशन यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले. याप्रश्नी तातडीने कारवाई न झाल्यास दि 5 डिसेंबररोजी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कर्जत शहरातून जाणाऱ्या अमरापूर भिगवण या रस्त्याचे काम शहराच्या दोन्ही बाजूने पूर्ण होत आलेले असताना अनेक महिन्यापासून शहरातील काम मात्र होत नाही काही दिवसांपूर्वी दादा पाटील महाविद्यालया पासून रस्ता खोदून काढला मात्र कुठे तरी माशी शिकली व काम न करताच पुन्हा रस्ता वाहतुकीस सुरू करण्यात आला यामुळे या संपूर्ण रस्त्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरले असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतीही जबाबदारी घेत नाही, की त्याचे कडे कोणतीही योग्य ती माहिती मिळत नाही त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कर्जत शहरातील रस्त्याच्या प्रश्नावर नव्यानेच कार्यभार घेतलेल्या व्यापारी असोशीएशनने लक्ष घालत याबाबत निवेदन देऊन हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली असून, या निवेदनात म्हटले आहे की शहरातून जाणारा अमरापूर ते भिगवन या रस्त्याचे काम दादा पाटील महाविद्यालया पासून अक्काबाई मंदिर या परिसरात बंद पडले आहे, काम बंद पडल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना व व्यापारी बांधवांना होत आहे. या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धुळीचा त्रास सर्वांना होत आहे. यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे. सध्या जेवढा रस्ता उपलब्ध आहे तेवढ्याच रस्त्यामध्ये काम करावे. अन्यथा सर्व व्यापारी बांधव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर दि 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता उपोषण करून आंदोलन करतील जर हा प्रश्न न सुटल्यास दि 6 डिसें रोजी कर्जत शहर बंद ठेवले जाईल असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आला आहे. सदरचे निवेदन अध्यक्ष बिभीशन खोसे, उपाध्यक्ष महावीर बोरा, सरचिटणीस प्रसाद शहा, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश जेवरे, अशोक लाळगे, पप्पूशेठ तोरडमल, व अनिल तोरडमल आदींनी विविध कार्यालयात देऊन हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पुढाकार घेतला आहे.