AalandiHead linesMaharashtraPachhim Maharashtra

अलंकापुरीत माऊलींचा वैभवी रथोत्सव हरिनाम गजरात

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : विना,टाळ,मृदंगाचा त्रिनादासह माउली,माउली,श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल,ज्ञानोबा माउली तुकाराम अशा नामगजरासह जयघोष करीत सोमवारी ( दि.२१ ) हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत द्वादशी दिनी माऊलींचा वैभवी चांदीचा मुखवटा रथोत्सवात पूजा बांधीत रथोत्सव हरिनाम गजरात प्रथा परंपरांचे पालन करीत साजरा झाला. रथोत्सव मिरवणूक ग्रामप्रदक्षिणा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल चा नामजयघोष झाल्यानंतर उपस्थित भाविकांचे हात श्रींचे रथोत्सवातील रथ ओढण्यास सरसावले. उद्या मंगळवारी ( दि. २२ ) आळंदीत माऊलींचा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा होत असल्याचे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले.

अलंकापुरीत भाविकांचे नामगजरात श्रींची रथोत्सवातून नगरप्रदक्षिणा.

आळंदीत ज्ञानभक्ती चैतन्यमयी वातावरण रथोत्सवात ग्रामप्रदक्षिणा मिरवणूकींने नगरप्रदक्षिणा कार्तिकी वारीत झाली. यावेळी रस्त्यांचे दुतर्फा उभे राहून श्रींचे दर्शन घेत भाविकांनी रथ हाताने ओढत आपली सेवा रुजू केली. तत्पूर्वी श्रींची पालखी मंदिरातून खांद्यावर घेत रथोत्सवास गोपाळपुरात परंपरेने आळंदी ग्रामस्थानी पालखी नामजयघोषात निघाली. आळंदीत द्वादशी दिनी सोमवारी ( दि. २१ ) दुपारी श्रींचे महानैवेद्यास भाविकांना दर्शन काही वेळ बंद ठेवण्यात आले होते. श्रींचा महानैवेद्य झाल्यानंतर भाविकांना दर्शन पुन्हा सुरू झाले.तत्पूर्वी मंदिरात श्रीना पहाटे पवमान अभिषेक,दुधारती झाली. परंपरेने खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण यांचे हस्ते पहाटे पंचोपचार पूजा झाली. यावेळी ऍडिशनल जिल्हाधिकारी विजयसिह देशमुख, तहसीलदार वैशाली वाघमारे, डॉ. वाघमारे, मंडलाधिकारी स्मिता जोशी, गणेश सूर्यवंशी, बी. आर. जाधव, अप्पर तहसीलदार हरीश सूळ आदी उपस्थित होते. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे पाटील यांचे नियंत्रणात आळंदी मंदिरात धार्मिक कार्यक्रम उत्साहात सुरु आहेत.

माऊलींचे मंदिरात श्रींचा वैभवी मुखवटा फुलांनी सजलेल्या चांदीचे पालखीत पूजा बांधीत विराजमान करण्यात आला. श्रींची पालखी खांद्यावर घेत महाद्वारातून शनिमंदिर मार्गे गोपाळपुरातील श्री राधाकृष्ण मंदिरात आली. श्रीकृष्ण मंदिरात परंपरेने इनामदार कुटुंबीयांच्या वतीने श्रींची विधिवत पूजा झाली. रथोत्सवास पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर, मानकरी व्यवस्थापक माऊली वीर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, उपव्यवस्थापक श्रीधर सरनाईक, श्रीचे सेवक दत्तात्रय केसरी, राजाभाऊ चौधरी ,क्षेत्रोपाध्ये इनामदार परिवार, बाळासाहेब रणदिवे चोपदार, बाळासाहेब कुऱ्हाडे , योगेश आरु, आळंदी देवस्थानचे पदाधिकारी, श्रींचे मानकरी, भाविक, वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.
पूजेच्या काळात परिसरातून भाविक, वारकरी, दिंडीकरी श्रींचे रथोत्सवात सहभागी होण्यास जमले होते. श्रींची पूजा होताच माउलींचा चांदीचा मुखवटा ग्रामप्रदक्षिणे साठी रथात ठेवण्यात आला. दरम्यान श्रींचे रथोत्सवास रथासमोर श्रीकृष्ण मंदिरासमोर भाविक वारकऱ्यांचे दिंडी तुन भगव्या पताका उंचावत माउली माउली‘चा गजर करत रथोत्सव सुरु झाला. ग्रामप्रदक्षिणा चाकण चौक,भैरवनाथ चौक,हजेरी मारुती मंदिर, विठ्ठल रुख्मिणी चौक मार्गे हरिनाम गजरात झाली.मंदिरात रथोत्सवाची सांगता झाली. मंदिर प्रदक्षिणा, धुपारती झाली.दरम्यान मंदिरात विना मंडपात हरिभाऊ बडवे ,केंदूरकर महाराज यांचे वतीने परंपरेने कीर्तन सेवा झाली.कीर्तन नंतर श्रींचे गाभाऱ्यात निमंत्रित खिरापत प्रसाद,प्रसाद वाटप विना मंडपात, फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख,सेवेकरी यांना नारळ प्रसादाचे वाटप परंपरेने झाले.

आज श्रींचा संजीवन समाधी दिन सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी दिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी परंपरांचे पालन करीत मंगळवारी ( दि. २२ ) अलंकापुरीत नगरीत साजरा होत आहे. या निमित्त शहरातील धर्मशाळांसह माउली मंदिर, इंद्रायणी नदी घाटावर श्रींचे संजीवन समाधी सोहळ्याचे प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा होणार आहे. तत्पूर्वी माउली मंदिरात श्रीना पवमान अभिषेक व दुधारती होईल. भाविकांचे महापूजा व संत नामदेवराय यांचे वतीने श्रीना नामदास महाराज परिवाराचे वतीने महापूजा होईल.परंपरेने विना मंडप,भोजलिंगकाका मंडप,हैबतरावबाबा पायरीपुढे परंपरेने कीर्तन सेवा रुजू होईल.सकाळी दहा वाजता नामदास महाराज यांचे वंशज परंपरेने श्रींचे संजीवन समाधी सोहळ्यातील कीर्तन होणार आहे. दरम्यान महाद्वारात काल्याचे कीर्तन त्यानंतर श्रीगुरु हैबतरावबाबा यांचे दिंडीची मंदिर प्रदक्षिणा होईल. दुपारी बाराचे सुमारास श्रींचे संजीवन समाधीवर पुष्पवर्षाव,आरती व घंटानाद होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांना नारळ प्रसाद वाटप व महानैवेद्याने भाविकांचे दर्शनास श्रींचा गाभारा खुला होईल. सोपानकाका देहूकर यांचे वतीने विना मंडपात कीर्तन त्यानंतर हैबतरावबाबा यांचे वतीने हरिजागर होणार असल्याचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले.

द्वादशी दिनी सोमवारी ( दि. २१ ) दुपारी श्रींचे महानैवेद्यास भाविकांना दर्शन काही वेळ बंद ठेवण्यात आले होते. श्रींचा महानैवेद्य झाल्यानंतर भाविकांना दर्शन पुन्हा सुरू झाले. रथोत्सव प्रसंगी आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांचे मार्गदर्शनात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होतो. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने मार्गावर विशेष स्वच्छता करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!