Breaking newsHead linesMaharashtraMumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांना अटक; राज्याचे राजकारण पुन्हा तापले!

– छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होणार असेल तर आम्ही सर्वच जेलमध्ये जाऊ – खा. सुप्रिया सुळेंचा इशारा
– आव्हाडांच्या अटकेवरून सत्ताधारी-विरोधक भिडले

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीचा इतिहास दाखविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महेश मांजरेकर यांच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध केल्याच्या प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली असून, या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, आम्ही सर्व अटक होण्यास तयार आहोत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. आव्हाड यांच्या अटकेनंतर ब्राम्हणवादीविरुद्ध बहुजनवादी असा वाद पुन्हा एकदा पेटणार असून, आव्हाडांच्या अटकेमागे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संशयाची सुई सरकली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित ‘हर हर महादेव’ या चित्रपटावर आता विविध संघटनांकडून आक्षेप घेतला जात आहे. या चित्रपटात शिवरायांशी संबंधित सर्रास चुकीचे प्रसंग दाखवण्यात आले आहे. याच घटनाक्रमादरम्यान ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. नंतर या प्रकरणावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया माध्यमांमध्ये उमटल्या. शिवाय, संभाजीराजे छत्रपती यांनीही या चित्रपटाला एक पत्रकार परिषद घेऊन विरोध दर्शवला होता. परंतु, आज अचानक आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना तातडीने न्यायालयात न नेता वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती देताना जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले, की ‘मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहर्‍यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. ‘हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेले नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही,’ अशी भूमिका आव्हाड यांनी घेतली आहे. दरम्यान, आव्हाड यांच्या अटकेनंतर ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने समर्थक जमा झालेले होते. दुसरीकडे, आम्ही छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ठणकावले. आम्ही सर्व जेलमध्ये जाण्यास तयार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले, की ‘आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो, नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या, असं ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.’ परंतु, त्यांनी बोलण्यात गुंतवून ठेवून मला अटक केली.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!