अजित पवार अखेर पत्रकारांसमोर आले, ‘मी कसला नाराज जरा विदेशात गेलो होतो’!
– पक्षात नाराज वैगरे काही नसल्याचे केले स्पष्ट
मावळ, जि. पुणे (युनूस शेख) – राष्ट्रवादी काँग्रेसने शिर्डी येथे आयोजित केलेल्या दोनदिवसीय मंथन शिबिराच्या समारोपाच्या संपूर्ण दिवसभर विरोधी पक्षनेते अजित पवार अनुपस्थित राहिल्याने नाराजीच्या चर्चाना उधाण आले होते. दरम्यान, नाराजीच्या या चर्चांवर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. पुण्यातील मावळ येथे पत्रकारांशी बोलताना माझ्यावाचून काही अडतं का, मला काही खासगी आयुष्य आहे की नाही, काहीपण बातम्या देता, अशा शब्दांत पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली. खासगी कामानिमित्त विदेशात गेलो होतो, असेही पवारांनी स्पष्ट केले.
शिर्डीतील अधिवेशनाच्या शिबिराच्या शेवटच्या दिवशी आजारी असलेले शरद पवार थेट ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून शिर्डीला पोहचले. त्यांना भाषण करणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांचे भाषण शेवटी दिलीप वळसे-पाटील यांनी वाचून दाखवले. या कार्यक्रमानंतर शरद पवार पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. तर सुप्रिया सुळेंविरोधात सत्तारांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतरही अजित पवारांची प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे अजित पवार हे पुन्हा नाराज असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र, त्यावर अजित पवारांनी या सगळ्या अफवा असल्याचे सांगत, पूर्णविराम दिला आहे. मावळ येथे बोलताना अजित पवार म्हणाले की, माझा सहा महिन्यांपर्ू्वी दौरा ठरलेला होता. त्यासाठी अगोदरच तिकिटे काढून ठेवलेली होती. त्यामुळे मी पाच-सहा दिवस सक्रिय नव्हतो. त्यानंतर मी नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. ही अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.
‘गेल्या पाच-सहा वर्षात मला विदेशात जाण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. माझा एक पूर्वनियोजित कार्यक्रम ठरला होता. त्यासाठी ४ तारखेला रात्री उशिरा दीड वाजता विमान होतं आणि गुरुवारी रात्री उशिरा परतणार होतो. पण अजित पवार नाराज आहेत, कुठेतरी गेलेत अशा चर्चा उठवण्यात आल्या. माझ्याशिवाय यांचं काय नडतं मला कळत नाही. दादाला काय खासगी आयुष्य आहे की नाही,’ असा संताप अजित पवारांनी व्यक्त केला.
—————–