– परिसरातील ग्रामस्थ संतप्त, पालकमंत्र्यांकडे रोडच्या गुणवत्तेच्या चौकशीची मागणी करणार!
– ठेकेदार काम करत असताना बांधकाम खात्याचा अधिकारी फिरकलाच नाही!
चिखली (एकनाथ माळेकर) – मेरा ते साखरखेर्डा या रोडवर खड्डे पडल्यामुळे त्याची दयनीय अवस्था झाली असून, हा रोड जीवघेणा बनल्याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने २ ऑक्टोबररोजी https://breakingmaharashtra.in/deulgaon_pwd_roads/ राज्यस्तरावर प्रखड वृत्त प्रकाशित करून, राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्या वृत्ताची दखल घेत, तातडीने या रोडच्या डागडुजीसाठी पैसा उपलब्ध करून देण्यात आला होता. आता या रोडचे डागडुजीचे काम करण्यात आले आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगावराजा यांच्या अधिकार्यांच्या खाऊगिरीमुळे संबंधित ठेकेदाराने हे काम अतिशय निकृष्टदर्जाचे केले असून, रोडसाठी डांबर फारच कमी वापरले गेले आहे. त्यामुळे गिट्टी व चुरी ही निघून आली आहे. त्यामुळे या रोडच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी लवकरच या भागाचे आमदार तथा माजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली जाणार असून, संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासह संबंधित अधिकार्याच्या चौकशीचीही मागणी केली जाणार आहे.
चिखली तालुक्यातील मेरा ते साखरखेर्डा रोडचे डागडुगीचे काम हे अतिशय निकृष्टदर्जाचे झाले असून, त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणी पुढे आली आहे. याबाबत ग्रामस्थ लवकरच वरिष्ठांकडे तक्रार दाखल करणार आहेत. निकृष्ट काम करून कुणी मलिदा खाल्ला ही बाब उघडकीस येणे गरजेचे बनले आहे. चार दिवसांपूर्वी मेरा ते साखरखेर्डा रोडचे डागडुगीचे काम ठेकेदाराने केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खाऊगिरी धोरणामुळे हे काम अत्यंत तकलादू व निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. संबंधित रोड हा सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगावराजा यांच्या हद्दीमध्ये येतो. या रोडमुळे भरपूर अपघात झाले असून, रोड खराब झाल्याने अनेकांची हाडे खिळखिळी होऊन अनेकांना मणक्यांचे आजार जडले आहेत. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वारंवार सडेतोडपणे आवाज उठविला होता. त्याची दखल घेत, या रोडचे काम अखेर सुरु झाले. परंतु, अधिकारी व ठेकेदाराने हे काम इतके निकृष्टदर्जाचे केले आहे, की ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत आहेत. याबाबत, सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगावराजाचे अधिकारी यांच्याशी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने संपर्क साधला असता, वरिष्ठ अधिकारी फोनसुद्धा उचलत नाहीत. तसेच, ग्रामस्थ भेटायला गेले असता, अधिकारी ठिकाणावर नसतात. या रोडचे डागडुजीचे काम चालू असताना, कोणताही अधिकारी ठेकेदाराकडे फिरकलादेखील नाही. त्यामुळे ठेकेदाराने दिखावू काम करून थातूरमातूरपणे काम केले आहे. ठेकेदार काम करत असताना, अधिकारी पाहणी करण्यासाठी का आले नाहीत, असे संबंधितांना विचारणा केली असता, त्यांनी प्रत्येक खड्ड्याजवळ आम्ही हजर राहणार का, असे उर्मट व बेजबाबदारपणाचे उत्तर दिले. कामाची पाहणी करण्यासाठीदेखील अधिकारी जात नसतील तर ते फक्त शासनाचा फुकटचा पगार घेण्यासाठीच आहेत का, असा संतप्त सवाल आता निर्माण होतो आहे.
मेरा ते साखरखेर्डा रोड हा समोर लोणार या जागतिक स्थळाला मिळत असल्यामुळे या रोडने भरपूर रहदारी आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगावराजाच्या अभियंत्याने ठेकेदाराशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधातून हे काम निकृष्टदर्जाचे केले आहे का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. सदर रोडवरील काम करताना कामावरील सुपरवायझर यांना ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या प्रतिनिधीने इतके निकृष्ट काम कसे काय करत आहात, याबाबत विचारले असता, त्याने काम असेच असते, असे उत्तर देऊन पळ काढला. या रोडवरील खड्डे बुजवताना डांबरचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे रोडवरील काम सुरू असतानाच पायानेसुद्धा खड्ड्यातील चुरी व गिट्टी बाजूला होऊन दिसत होती. दोन दिवसातच सदर रोडवरील चुरी सर्व निघून गेलेली आहे. या कामावर असलेले अधिकारी कुठे गायब असतात, याबाबतसुद्धा लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. रोडवरील झालेले काम हे पूर्णतः निकृष्ट दर्जाचे झालेले असून, सदर रोड हा बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघातील आहे. या रोडच्या खड्ड्यामुळे दोन वर्षाच्याआधी दोन युवकांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. मेरा बुद्रुक येथील बद्रीनाथ पडघान व गजानन चेके अशी त्यांची नावे असून, या घटनेबाबत देऊळगावराजाच्या अभियंत्यांना काहीही सोयरसुतक वाटत नाही. वास्तविक पाहाता, या अधिकार्यांवर त्याचवेळी सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणे गरजेचे होते.
आतादेखील सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगावराजा हे आणखी किती लोकांच्या जीवाशी खेळणार, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मेरा खुर्द येथेसुद्धा रस्त्याचे अतिशय निकृष्टदर्जाचे काम चालू असताना गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी संबंधित विभागाच्या कर्मचार्यांना फोन केला असता, त्यांनासुद्धा उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. या रोडच्या साईडला जी झाडे आहेत, त्यामुळेसुद्धा समोरील वाहन दिसत नाही. त्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे कष्टसुद्धा घेतले गेले नाहीत. या राेडचे काम अतिशय निकृष्टदर्जाचे होत असताना वरिष्ठ अधिकारी फक्त आम्ही काम पूर्ण केले आहे, असे सांगून आपले हात झटकत आहेत. या कामाच्या गुणवत्तेबाबत परिसरातील ग्रामपंचायती, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते हे लवकरच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन देऊळगावराजाच्या संबंधित अभियंत्याविरोधात लेखी तक्रार दाखल करून रोडच्या गुणवत्तेच्या चौकशीची मागणी करणार आहेत.
—————–