– तब्बल २५ हजार ब्रास वाळूचा सरकारला चुना, दोन कोटीची रेतीचोरीची शक्यता?
– बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज
– वाळूतस्करावर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा अन्नत्याग आंदोलनाचा इशारा
चिखली (एकनाथ माळेकर) – इसरूळ येथे एक गावगुंड प्रवृत्तीचा रेतीतस्कर दिवसाढवळ्या बोटीद्वारे वाळूतस्करी करत असून, याबाबत ग्रामस्थांनी चिखली तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली असता, तहसीलदारांनी कारवाई करण्याआधीच सदर वाळूतस्कराने आपला तब्बल ६०० ब्रास वाळूसाठी रातोरात गायब केला आहे. विशेष म्हणजे, देऊळगावराजा-चिखली हद्दीवरील इसरूळ या गावात ग्रामस्थांच्या तक्रारीवरून देऊळगावराजाच्या नायब तहसीलदारांसह महसूल पथकाने धडक देऊन हा साठा पाहिला होता. परंतु, त्यांचे कार्यक्षेत्र नसल्याने हे पथक परत गेले होते. चिखली तहसीलदारांनी काही अॅक्शन घेण्यापूर्वीच हा रेतीसाठी गायब झाल्याने संबंधित वाळूतस्करावर तातडीने गुन्हे दाखल करावेत, तसेच गेल्या दोन वर्षात या रेतीतस्कराने २५ हजार ब्रास वाळूची चोरी केली असून, त्यापोटी जवळपास दोन कोटी रुपयांचा सरकारला चुना लावला आहे. याबाबत चिखली तहसीलमधील कोणता अधिकारी या रेतीतस्कराला पाठीशी घालत आहे? व त्यापोटी मलिदा लाटला जात आहे का? याची माहिती जिल्हाधिकारी यांनी घ्यावी व संबंधित अधिकार्यावरदेखील तातडीने कारवाई करून त्याच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
सविस्तर असे, की दि. १ नोव्हेंबर रोजी चिखली तहसीलदार यांना इसरूळ येथील ग्रामस्थांनी इसरूळ येथील बोटद्वारे रेती उत्खनन करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असता, तक्रारीत त्यांनी चिखली तहसील हद्दीत येणार्या देऊळगाराजा तहसीलच्या सीमेवरील एक वाळूतस्कर बोटद्वारे अवैध उपसा सुरू असून, त्या ठिकाणावरून दोन वर्षांपासून दिवसाढवळ्या बोटद्वारे रेती उपसा सुरू असल्याची तक्रार चिखली तहसीलदार यांच्याकडे केली होती. परंतु वारंवार तक्रार करून व तोंडी सांगूनदेखील महसूल कार्यालयाने कुठलीही दखल न घेतल्याने रेती उत्खनन करणारा व्यक्ती नदीपात्रातून गेल्या दोन वर्षांपासून २५ हजार ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करत आला आहे. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर सदर ठिकाणी देऊळगावराजाचे नायब तहसीलदार कुलमेथे, मंडळ अधिकारी मोगल, तलाठी बुरकुल, गावचे पोलीस पाटील आदींनी प्रत्यक्ष जावून पाहणी केली असता, तेथे अवैध रेती सहाशे ब्रास उपलब्ध साठा दिसून आला होता. त्यामुळे गावकर्यांचे तात्पुरते का होईना समाधान झाले होते. परंतु सदर ६०० ब्रास अवैध साठा हा दे राजा-चिखली सरहद्दीवर असल्याने त्यांनी चर्चेदरम्यान इसरूळ हे गाव चिखली तहसीलच्या हद्दीत असल्याने, व या आधी याठिकाणी चिखली तहसीलने रेती उपसा करण्याचे साहित्य जप्त केलेले असल्याने, सदर उपलब्ध साठा चिखली तहसीलदार जप्त करेल, असे गावकर्यांना आश्वासन दिले होते. परंतु तहसीलचे कर्मचारी त्या ठिकाणांवरून गेल्यानंतर लगेचच संबंधित वाळूतस्कराने सदर ठिकाणी असलेला अवैध साठा हा रातोरात गायब केला. त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या ३५३ कलमासह चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांनी आजवर केलेल्या रेतीच्या २५ हजार ब्रास अवैध उत्खननाचा दंड म्हणून दोन कोटी रुपयाचा बोजा नदीपात्रालगत असलेल्या या वाळूतस्करावर व सदर उत्खनन सुरू असलेल्या शेतावरदेखील टाकावा व कायदेशीर गुन्हा दाखल करून दंड वसूल करावा, म्हणजेच यानंतर कुणीही इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करण्यास धजावणार नाही व त्याठिकाणी असलेल्या रेतीचे मोठमोठ्या ढिगार्याचे प्रत्यक्षदर्शी पुरावादार म्हणून देऊळगावराजा नायब तहसीलदार कुलमेथे, मंडळधिकारी मोगल, तलाठी बुरकुल व पोलीस पाटील हे तर आहेच. त्याचबरोबर इसरूळ, चिंचखेड येथील ५०० च्यावर ग्रामस्थदेखील पुरावेदार म्हणून आहेत. तरी आधी ज्या प्रमाणे आपण त्याठिकाणावरून रेती उत्खनन करण्याचे साहित्य जप्त केले होते. त्याच प्रमाणे बोट जप्त करून तात्काळ संबंधित रेतीतस्करावर तीन दिवसांच्याआत कारवाई करावी. अन्यथा सदर उपसा सुरू असलेल्या ठिकाणावर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.