मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – दिवसेंदिवस वाढत असलेले खत-बियाण्यांचे दर, शेतीची मशागत व उत्पादनाच्या खर्चात झालेली भरमसाठ वाढ, नैसर्गिक आपत्तीचा सामना करून पिकविलेल्या शेतमालाला बाजारपेठेत निचांकी दर मिळत आहेत. दुसरीकडे, मजुरीच्या दरातही वाढ होत आहे. कापूस वेचणीसाठी प्रतिकिलो सात रुपये मोजावे लागत असून, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. एकीकडे कापसाला नसलेला भाव, वाढलेला खर्च आणि मजुरीचे दर पाहाता, शेतकर्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या शिवाय, मजुरांना शेता घेऊन जाणे व नेऊन सोडण्यासाठी गाडीभाड्याचीही सोय शेतकर्यांना करावे लागत आहे. इतके करूनही मजूर मिळत नाही, अशी समस्या निर्माण झालेली आहे. मनमानी पद्धतीने वाढलेल्या मजुरीवर लगाम लावण्यासाठी राज्य सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
यंदा सोयाबीन, कपाशी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या हंगामात अतिवृष्टीने खरीपातील सर्वच पिकांना फटका बसला. सततच्या पावसामुळे मूग, पाठोपाठ सोयाबीन सडले, उभ्या पिकांना कोंब फुटले. पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कपाशीच्याबोंडे काळवंडली. फुले गळून पडली. कसेबसे तग धरून राहिलेला कापूस आता फुटत असताना ढगाळ बातावरण आणि उघडीप यात अडकलेला. कापूस उत्पादक शेतकरी आता कापसाची बेचणी करून घेत आहेत. ऐनवेळी कापूस वेचणीसाठी मजुरांच्या टंचाईने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शासनाने कापसाला हमीभाव जाहीर केला असला तरी अद्यापही खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. त्यातच यंदा कापसाचा दर्जा खालावलेला असल्याने व्यापार्याकडून खेडा खरेदीतून कवडीमोल भावात कापसाची खरेदी होत आहे. त्यात आता कापूस वेचणी दरात प्रतीकिलोमागे २ ते ३ रुपयांची वाढ झालेली आहे.
पावसामुळे यंदा खरीपातील प्रमुख नगदी पीक सोयाबीनला अतिवृष्टीमुळे कमी उतारा येत आहे. मागील वर्षी कापूस वेचणीचा दर ५ रूपये प्रती किलो प्रमाणे होता. यामध्ये यंदा वाढ झालेली आहे. सध्या कोरडवाहू क्षेत्रातील कापूस वेचणीचा दर ८ रूपये तर ओलिती क्षेत्रातील कापूस वेचणीचा दर ७ रूपये प्रती किलो आहे. दरम्यान, ऐनवेळी मजूर मिळत नाहीत, त्यासाठी प्रती मजुराला किमान १०० ते १५० रुपये जाण्या-येण्याचे भाडे अतिरिक्त द्यावे लागत आहे, किंवा गाडी करून घेऊन जावे व आणून सोडावे लागत आहे. जे शेतकरी आर्थिक सबळ आहे, ते ही झळ सोसू शकतात. परंतु, अल्पभूधारक व गरीब शेतकरी मेताकुटीला आलेले आहेत.