बुलढाणा (एकनाथ माळेकर) – नैसर्गिक आपत्ती, वाढलेला उत्पादन खर्च आणि पिकाला मिळणारा तुटपुंजा भाव यामुळे शेतकरी प्रचंड हतबल झाले असून, बळीराजाच्या मनात असलेला तीव्र रोष काल एल्गार मोर्चाच्या निमित्ताने बाहेर पडला. सोयाबीन – कापूस उत्पादकांचा रेकॉर्डब्रेक असा भव्यदिव्य मोर्चा काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकार यांच्या नेतृत्वात बुलढाण्यात निघाला. मोर्चाआधी सोयाबीनला केंद्र सरकार चांगला भाव देणार असल्याच्या काही लोकप्रतिनिधींच्या भुलथापांना बळी न पडता हजारो शेतकरी, माय-माऊल्या या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. आता आठवडाभरात सोयाबीन, कापसाला भाव न मिळाल्यास राज्यभर वणवा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोयाबीन-कापसाला योग्य भाव मिळावा, ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीची मदत मिळावी, दिवसा वीज द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाभरातील हजारो शेतकरी व शेतकरीपुत्र तसेच मायमाऊल्या या कालच्या एल्गार मोर्चात एकजुटीने सामील झाल्या होत्या. या मोर्चाची ताकद पाहता आपल्याला न्याय मिळाल्यावाचून राहणार नाही याची खात्री शेतकर्यांना वाटते आहे. त्यामुळे कापूस व सोयाबीन विकण्याची घाई करू नका, भाववाढ मिळेल, अशी भावना शेतकरी गावोगावी व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आठवडाभराचा अल्टिमेटम राज्य व केंद्र सरकारला दिला असून, या कालावधीत भाववाढ देण्यासाठी सरकारवर दबाव वाढला आहे. मुदतीत भाववाढ न मिळाल्यास मात्र राज्यभर वणवा पेटणार असून, शेतकरी आक्रमक झालेले आहेत.
येत्या ८ दिवसांत सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलनाचा हा वणवा राज्यभर पसरेल. एक-एक शेतकरी आपल्या हक्कांसाठी पेटून उठेल. सोयाबीन-कापसाला भाव मिळवूनच राहणार, हा निर्धार आता शेतकर्यानी केला आहे. आता भाव मिळेपर्यंत मागे वळणार नाही! शेतकर्यांचे हे प्रेम, आशीर्वाद मला मोठी ऊर्जा देणारे ठरले.
– रविकांत तुपकर, शेतकरी नेते
—————