– नवीन एसपींना बुलढाण्याचे हवामान आवडले
– ठाणेदारांना पोस्टिंग देताना परफॉमर्न्स तपासणार
बुलढाणा (एकनाथ माळेकर) – जिल्ह्यातील अवैध धंदे, गैरप्रकाराची माहिती मिळाली आहे. यापुढे सर्व अवैधधंदे बंद केले जातील. या अवैध धंद्यांना कुणाचाही वरदहस्त असला तरी तो सहन केला जाणार नाही. जिल्ह्याचा क्राईम रेट तसा कमी आहे. तो आणखी कमी करण्यावर आपला भर राहील. ज्या ठाणेदारांचा परफॉर्मन्स चांगला असेल, त्यांनाच पोस्टिंग देताना प्राधान्य दिले जाईल, असे सांगून नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी ज्येष्ठ पत्रकार, संपादकांशी संवाद साधला. बुलढाणा जिल्ह्याचे हवामान त्यांना आवडल्याचे त्यांच्या चर्चेतून दिसून आले.
जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, संपादक यांच्याशी बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड म्हणाले, की बुलढाणा जिल्हा तसा आरोग्यासाठी पोषक आहे. क्राइम रेट क्षेत्रफळाच्या मानाने कमी आहे, परंतु जिल्ह्यामध्ये अनेक अवैद्य धंदे खुलेआम सुरू असल्याची मला माहिती मिळाली आहे. या अवैध धंद्यांना कोणाचे वरदहस्त आहे व ती व्यक्ती कोण आहे, याची तमा न बाळगता अवैद्य धंद्यावर लगाम घालण्यासाठी कठोर पावले उचलणार आहोत. जिल्ह्यातील मेहकर, चिखली, लोणार, अंढेरा, जानेफळ, डोणगाव या पोलीस स्टेशनच्या सीमेत खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत पोलीस अधीक्षक यांना माहिती दिली असता, या पुढे तेथे ठाणेदाराची पोस्टिंग करताना त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या भागात अवैध धंद्याचा आलेख कसा आहे, हे बघूनच पोस्टिंग करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक पुढे म्हणाले, की कधी कधी हस्तक्षेप अडचणीचा भाग ठरू शकतो. कायदा व सुव्यवस्था पाळताना हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी संबंधितांना नीक्षून सांगितले. पक्ष, राजकीय गट यांचा विचार न करता निरपक्ष कारवाई करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नुकतेच व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या शहर शाखेच्या पदाधिकार्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आवाड यांचा त्यांच्या दालनात जाऊन सत्कार केला. यावेळी पोलिस अधीक्षकांनी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक विषयावरही मनमोकळा संवाद साधला. बुलढाणा शहराचे आरोग्याला पोषक असलेले वातावरण, निसर्ग संपदा, तसेच बुलढाणा परिसरात पिकवल्या जाणारा भाजीपाला यावरदेखील त्यांनी दिलखुलास संवाद साधला. या भेटीप्रसंगी वाईस ऑफ मीडियाचे शहर कार्यकारणी अध्यक्ष गणेश निकम, कोषाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, सोहम घाडगे, गणेश उबरहंडे, शौकत शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अंढेरा पोलिस ठाणेहद्दीतील मेरा बुद्रूक, अंत्री खेडेकरमध्ये वरली व देशी दारूचे धंदे जोरात सुरू आहेत. दारूबंदी विभागाचे कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी आहे. परंतु ते नावापुरतेच आहे का, दारूबंदी विभागाचे अधिकारी कोणती कारवाई करतात, असे प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झालेले आहेत. मेरा बुद्रुक येथे वरलीचा सर्वात मोठा खेळ जोमात सुरू आहे. देशी दारूचे रात्रीला नियोजनबद्ध वितरण चालते. देशी दारू पोहोच करण्याचे काम सूत्रबद्धपणे होत आहे. त्यामुळे गावोगावीचे तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील हे फक्त कागदोपत्रीच आहेत का, असा सवालही आता ग्रामीण भागातून उपस्थित होऊ लागला आहे.
——————-