मलगी फाट्यावर दोन वाहने धडकली, सुदैवाने जीवितहानी टळली, वाहनांचे मात्र मोठे नुकसान!
मिसाळवाडी, ता. चिखली (गजानन मिसाळ) – गतिरोधक नसल्याने मलगी फाट्यावर अपघातांची मालिका सुरुच असून, आजदेखील सायंकाळी साडेसहा वाजता पीकअप व स्विफ्ट डिझायर या दोन वाहनांत जोरदार धडक होऊन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी, स्विफ्ट डिझायरच्या चालकाचा हात मोडला असून, गाडीतील प्रवाशांना मोठा मार लागलेला आहे. घटनास्थळी चिखली पोलिसांनी धाव घेत, जखमींना दवाखान्यात हलवले. मलगी फाट्यावर तातडीने गतिरोधक बसविण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
चिखली-देऊळगाव राजा हा मार्ग चौपदी झाल्यापासून या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून, याच मार्गावर इसरूळ, मंगरूळ, मिसाळवाडी, शेळगाव आटोळकडे जाणारा रस्ता मलगी फाटा येथे फुटतो. परंतु, मलगी फाट्यावर गतिरोधक नसल्याने वाहने सरळ वेगात जातात व वारंवार छोटेमोठे अपघात होत आहेत. आजदेखील सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास देऊळगावराजा-देऊळगावमही इकडून येणारी स्विफ्ट डिझायर गाडी व डौलखेडाच्या पीकअप गाडीची क्रॉसिंग करताना जोरदार धडक झाली. या धडकेने मोठा आवाज झाल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती. अपघाताची तीव्रता गंभीर होती, परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तरीही स्विफ्ट डिझायर गाडीच्या चालकाचा हात मोडला असून, इतर प्रवाशांनाही चांगलाच मार लागला होता. पीकअप गाडी ही डौलखेड येथील असून, पवन ज्ञानेश्वर डोळस असे चालकाचे नाव आहे. त्यालादेखील या अपघातात किरकोळ मार लागलेला आहे. या अपघातात स्विफ्ट डिझायर कारमधील वसीम नसीम सय्यद (वय ३०) व आशीष खिल्लारे (वय ३०) हे दोघे राहणार देऊळगावमही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर चिखली येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना तातडीने चिखली येथील रुग्णालयात हलवले असून, घटनास्थळाचा पंचनामा चालविला होता. या अपघातात दोन्ही वाहनांचे बरेच मोठे नुकसान झालेले आहे.
मलगी फाट्यावर गतिरोधक बसवा, अन्यथा रस्ता रोको!
मलगी फाट्यावर गतिरोधक नसल्याने शेळगाव आटोळ, मिसाळवाडीकडे येणारी वाहने अथवा इकडून चिखली, देऊळगावराजाकडे जाताना, क्रॉसिंग करताना, भरधाव वाहनांच्या धडका बसत आहेत. त्यामुळे या मार्गावर तातडीने गतिरोधक बसवावे. या फाट्यावर वारंवार छोटेमोठे अपघात होत असताना, बांधकाम खाते झोपा काढत आहे का?, असा संतप्त सवाल मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील यांनी केला असून, गतिरोधक न बसविल्यास आम्ही पाच ते सहा गावांतील ग्रामस्थांसह रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारादेखील सरपंच पाटील यांनी दिलेला आहे.