राज्यात मध्यावधी निवडणुका, शिवसैनिकांनो कामाला लागा!
– मुंबईत संपर्कप्रमुखांची तातडीने बैठक, राष्ट्रवादीनेही दिले निवडणुकांचे संकेत
मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्यात कोणत्याहीक्षणी मध्यावधी निवडणुका लागू शकतात. त्यादृष्टीने आतापासून कामाला लागा, असे आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत. शिर्डीतील मंथन शिबिरातून राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश आपल्या नेते, कार्यकर्ते यांना दिले असताना, ठाकरे यांनीही संपर्कप्रमुखांची तातडीने बैठक घेत, निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेनेने जिल्हानिहाय नियोजन केले असून, आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः राज्य पिंजून काढण्यासाठी ‘मातोश्री’ बाहेर पडणार आहे. अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, नजीकच्या काळात ठाकरे व शिंदे गट एकत्र येण्याची दाट शक्यता आहे.
मुंबईतील दादरमधील शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी राज्यभरातील संपर्कप्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरेंनी मध्यवधी निवडणुकांचे संकेत देत, तयारीला लागण्याचे आदेश दिले. दरम्यान, खासदार अरविंद सावंत यांनीही उद्धव ठाकरे यांच्या या संकेताला दुजोरा दिला आहे. २०१४ पूर्वी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका एकाचवेळी झाल्या होत्या. पण २०१२ नंतर विधानसभेची निवडणूक लागली. तेव्हा हिमाचल प्रदेशची निवडणूक आधी झाली. नंतर गुजरातची झाली. मधल्या काळात बर्याच घोषणा झाल्या. घोषणा झाल्या आणि निवडणुका लागल्या. आताही तेच होण्याची शक्यता आहे, असे अरविंद सावंत म्हणाले.
आमदार मनिषा कायंदे यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षाचे महत्त्वाचे निरोप असतात ते ‘मातोश्री’तून जात असतात. बाळासाहेब ठाकरे हेसुद्धा असे संकेत देत असत. हे संकेत संपर्क प्रमुख मतदारसंघात देत असत. तसेच विधानसभा मतदारसंघातील छोट्यातील छोटी घडामोड पक्षप्रमुखांकडे पोहोचवली जाते. ती पद्धत गेल्या ५० वर्षापासून सुरू आहे, असे मनिषा कायंदे म्हणाल्या. दरम्यान, शिर्डीमध्ये मंथन शिबिरामध्ये बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मोठा दावा केला आहे. शिर्डीत काँग्रेसचे शिबीर झाले आणि सरकार पडले होते. आता राष्ट्रवादीचे झाल्यानंतरही तसेच होवू शकते. कारण एकनाथ शिंदेंचे सरकार पडायला पुढे आले आहे, असा दावाच पाटील यांनी केला आहे.
———