– खामगावातील घटना – हर्ट अॅटॅकने टिळक पुतळ्याजवळ कोसळले होते आजोबा!
खामगाव (तालुका प्रतिनिधी) – वयाची पासष्टी गाठलेले आजोबांना खामगावमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका बसला व ते खाली कोसळले. शहरातील टिळक पुतळा येथे ते बेशुद्धावस्थेत बराचवेळ पडून होते. परंतु, कुणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. शेवटी वीरेंद्र चव्हाण यांना ते आजोबा दिसले. त्यांनी स्थानिकांना आजोबांना मदत करण्याची विनंती केली. कुणीही त्यांच्या मदतीला आले नाही, पोलिसांना कळवले तर तुम्हीच रुग्णालयात घेऊन जा, असा उद्धट सल्ला खामगाव पोलिसांनी दिला. त्यामुळे चव्हाण यांनी एकनिष्ठा फाउंडेशनला या घटनेची माहिती दिली. लगेच या फाउंडेशनचे सदस्य धावून आले, आणि आजोबांना शासकीय रुग्णालयात नेले. बाळापूर तालुक्यातील या आजोबांचे आता प्राण वाचले असून, त्यांच्यावर अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरजभैय्या यादव, वीरेंद्र चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकार्यांच्या तातडीच्या प्रयत्नामुळे एका आजोबाला जीवदान मिळू शकले आहे.
सविस्तर असे, की दिनांक ४ नोव्हेंबररोजी सायंकाळी ६ वाजता टिळक पुतळ्याजवळ बाजूला एक आजोबा बेवारस स्थितीत बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेले होते. वीरेंद्र चव्हाण यांनी लोकानां व ऑटोवाल्यांना सुद्धा विनंती केली. परंतु कुणीच या आजोबाच्या मदतीला गेले नाही. मग नंतर त्यांनी शहर पोलीस स्टेशनला कॉल केला असता, त्यांना सांगणयात आले की तुम्ही रुग्णालयात घेऊन जा. चव्हाण एकटे असल्याने रुग्णाला नेणे शक्य नव्हते. मग त्यांनी लगेच एकनिष्ठा फाउंडेशनला माहिती दिली. ही माहिती मिळताच, फाउंडेशनचे सुरजभैय्या यादव, सुनिल राऊत, शुभम यादव, अर्जुन कोंडाने, प्रदीप शमी यांनी लगेच त्या आजोबाला खामगांव सामान्य रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्या आजोबाची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यांना हृदयविकाराचे झटके आल्याचे निष्पन्न झाले. रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढ़ील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले. डॉक्टर व फाउंडेशनच्या सदस्यांनी या रुग्णाची ओळख पटवली असता, अंबादास तुलसीदास मालठे, वय ६५ वर्ष, राहणार बटवाडी, तालुका बाळापूर असे त्यांचे नाव निष्पन्न झाले. सामान्य रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेद्वारे सुरजभैय्या यादव, चालक विलास जाधव, शुभम यादव आदींनी मेडीकल कॉलेज खोली क्रमांक ९ मध्ये या आजोबांना दाखल केले असून, अकोला येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. सद्या ते व्हेंटिलेटरवर असल्याचे सुरजभैय्या यादव यांनी सांगितले आहे.