कर्जत (तालुका प्रतिनिधी) – भारताचे लोहपुरुष तथा माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात येते. या अनुषंगाने कर्जत महसुल विभागाच्यावतीने एकता दौड आयोजित करण्यात आली होती.
राष्ट्रीय एकात्मता साधत आपण सर्व जण एक आहोत, हा संदेश देण्यासाठी ही दौड आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली तर, तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी या दिनाचे महत्व सांगत सर्वांचे आभार मानले. सदरची दौड कर्जत तहसील कार्यालयापासून सुरू होत, छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्याची सांगता झाली. नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगलेसह तहसील कार्यालयाचे मोजकेच कर्मचारी सहभागी झाले होते. सर्व सामाजिक संघटनेचे नियमित श्रमप्रेमीनी या एकता दौडमध्ये सहभाग घेतला. सद्भावना यात्रेसाठी सायकलवर निघालेले स्नेहप्रेमचे फारूक बेग व त्याचे सहकारीही दौडीत सहभागी झाले होते, त्याच्या कर्जत ते आनंद वन या सायकल रॅलीला सर्वानी शुभेच्छा दिल्या व त्यांना रवाना केले.