सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – सिंदखेडराजा तालुक्यातील सातही मंडळात १७ व १८ तारखेला झालेल्या अतिवृष्टीच्या मुसळधार पावसाने सोयाबीन, कपाशी ही पिके उद््ध्वस्त झाली असून, साखरखेर्डा परिसरात वीज पुरवठा खंडीत झाल्याने ग्रामस्थांना रात्री अंधारात काढाव्या लागल्या होत्या. राज्य सरकारने अतिवृष्टीच्या संदर्भात वेगवेगळ्या मोजपट्ट्या, निकष न लावता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास रिंढे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत त्यांनी तहसीलदारांना निवेदनही दिले आहे.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना शिवदास रिंढे यांनी सांगितले, की सिंदखेडराजा तालुक्यातील सातही मंडळात दिनांक १७ व १८ तारखेला मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे सोयाबीन व कपाशी पिके उद््ध्वस्त झाली आहेत. दोन्ही दिवस रात्रभर पाऊस धो-धो कोसळत होता. त्यामुळे सोंगून ठेवलेल्या सोयाबीनचा अक्षरशः पोतरा झाला. तर फुटलेल्या कापसाच्या वाती तयार झाल्या. साखरखेर्डा परिसरात दोन्ही दिवस वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थांना अंधारात रात्री काढाव्या लागल्या. मोहाडी, शिंदी, राताळी, सवडद, गुंज, वरुडी, सावंगी भगत, गोरेगाव, साखरखेर्डा, पिंपळगाव सोनारा, दरेगांव, नागझरी, बाळसमुद्र, तांदुळवाडी, उमनगांव, पांगरी काटे, शेंदुरजन, राजेगाव, आंबेवाडी, हनवतखेड, हिवरागडलिंग यासह तालुक्यातील सर्वच गावातील पिकांचे मातेरे झाले आहे. शासनस्तरावर अतिवृष्टीच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीच्या मोजपट्ट्या व निकष लावले जातात, ते सर्व बाजूला ठेऊन शासनाने शेतकर्यांना तात्काळ सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणीही शिवदास रिंढे यांनी केली आहे.
शेतकरी उद््ध्वस्त झाला असताना पालकमंत्री जिल्ह्यात कधी येणार?
राज्य सरकारने तातडीने शेतकर्यांना मदतीची घोषणा केली पाहिजे. ऐन दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन पीक हातचे गेल्याने शेतकरी खचून गेलेला आहे. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे एकदा आले, हारतुरे घेतले, राजकीय सभा घेतल्या आणि पुन्हा जिल्ह्याकडे फिरकलेही नाही. आता शेतकर्यांवर मोठे संकट कोसळले असताना, पालकमंत्री जिल्ह्यात येत नसतील तर ही मोठी शोकांतिका आहे. तेव्हा, पालकमंत्र्यांनी बुलढाण्यात यावे, जिल्हा प्रशासनाची बैठक घ्यावी, त्यांना पंचनाम्यांत वेळ घालण्याऐवजी, सर्व्हे करण्याचे आदेश द्यावेत, व हतबल झालेल्या शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही शिवदास रिंढे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना केली आहे.
—————-