Aalandi

स्पर्धेच्या युगात शैक्षणिक संस्था चालविणे अवघड : आमदार दिलीप मोहिते पाटील

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : सध्याचे स्पर्धेच्या युगात शैक्षणिक संस्था चालविणे सोपे राहिले नसून संस्था चालकांना संस्था चालविता अनेक समस्यांना तोंड देत खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.

आळंदीतील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विस्तारित शालेय इमारतीचे उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार मोहिते पाटील बोलत होते. श्री. दीपचंदजी सोनराजजी ओसवाल परिवार, पुणे (पुष्पक स्टील इंडस्ट्रीज प्रा. लि. धानोरे), अल्का ग्रुप (पुणे) व इंद्रायणी फेरोकास्ट प्रा. लि. (धानोरे) व संघवी सौ. मदनबाई सोनराजजी कटारिया परिवार यांच्या विशेष देणगीतून आळंदीत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विस्तारीत शालेय इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले. या विस्तारित इमारतीचे उद्घाटन शांतीब्रह्म ह.भ.प. मारोती महाराज कु-हेकर, ह.भ.प. डाॅ. नारायण महाराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी दीपचंदजी सोनराजजी ओसवाल व परिवार (उद्योगपती, पुणे) यांची विशेष उपस्थिती होती. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे हस्ते फीत कापून तसेच विस्तारित इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

या प्रसंगी दीपचंदजी सोनराजजी ओसवाल व परिवार (उद्योगपती, पुणे), ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विश्वस्त प्रकाश काळे, लक्ष्मण घुंडरे, अनिल वडगावकर, कृष्णाखोरे विकास खोरे विकास महामंडळाचे संचालक डॉ. रामशेठ गावडे, उद्योजक योगेंद्र कु-हाडे, पांडुरंग गावडे, शिवाजी गावडे, रमेश आढाव, अरूण चौधरी, साहेबराव कु-हाडे, अनिल गावडे, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी, शिक्षकेतर प्रतिनिधी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते. आमदार मोहिते पाटील म्हणाले, शैक्षणिक संस्था चालविणे सोपे काम नाही. शैक्षणिक संस्था चालकांना खूप त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत देखील स्वर्गीय ताराचंदजी वडगावकर यांच्या पासून आळंदीत वडगावकर परिवार चिकाटीने सामाजिक, शैक्षणिक वारसा चालवत आहे.
त्याचबरोबर आजच्या विद्यार्थ्यांना संस्काराची गरज, बदललेले शैक्षणिक धोरण, नीतिमत्ता तसेच ओसवाल परिवारामध्ये असलेल्या दातृत्व वृत्ती व या वृत्तीतून परिवाराने केलेल्या दानामुळे कित्येक विद्यार्थी वेगवेगळ्या सन्मार्गावर पुढे जातील असे सांगत ओसवाल आणि वडगावकर परिवार यांच्या शैक्षणिक योगदानाच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, डॉ. नारायण महाराज जाधव, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, प्रकाश काळे यांनी ओसवाल परिवाराच्या या विशेष योगदान बद्दल मनोगतातून कौतुक केले. प्रास्ताविक अजित वडगावकर यांनी केले. सूत्रसंचालन सूर्यकांत मुंगसे व योगेश मठपती यांनी केले. आभार प्रदीप काळे यांनी मानले. सांगता दिपक मुंगसे यांचे पसायदान गायनाने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!