– चार ते पाच हजारावर भाव कोसळले, सण साजरा कसा करणार?
– यंदा सोयाबीन काढणीचा खर्चही वाढला, पावसानेही शेतकर्यांना दिला दणका
किनगावजट्टू, ता. लोणार (जयजीत आडे) – यंदा आस्मानी आणि सुलतानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला असतानाच, आता सोयाबीनचे भाव कोसळले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, त्याच्याप्रश्नी कोणताही आमदार, खासदार, शेतकरी नेता आवाज उठवताना दिसत नाही. चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये तर भिजलेल्या कमी प्रतीच्या सोयाबीनला तीन हजार प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याचे भीषण वास्तव आहे. शेतकरी केवळ दहा ते वीस टक्के सोयाबीन बाजारात आणत आहेत. दिवाळीत सोयाबीनचा भाव वाढेल या आशेवर बळीराजा आहे. मात्र जगाचा पोशिंदा आर्थिक परिस्थितीच्या कचाट्यात सापडला असून, सद्या प्रचंड हादरून गेलेला आहे.
दरवर्षी बळीराजा आपले नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहतो. यावर्षी मुहूर्तालाच साधारणः चार हजार ते पाच हजाराच्याआत भावाने व्यापारी सोयाबीन खरेदी करत आहेत. मागील वर्षी याच हंगामात सुरुवातीला सहा ते साडेसहा हजार भाव सोयाबीनला मिळाला होता. बळीराजाची सर्व मदार ही सोयाबीनच्या पैश्यांवर असते आणि तेच सोयाबीनचे भाव बळीराजला मेटाकुटीला आणत आहेत. शेतकर्याची दिवाळी, पुढील रब्बी पिकांचे नियोजन हे सोयाबीनच्या पैशांवर आधारित असते. परंतु, आता भाव कोसळल्याने शेतकरी पुरता हादरून गेला आहे.
एकीकडे सोयाबीनचे भाव गडगडल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला असतानाच, पाऊस पडल्याने सोयाबीन पाण्यात गेले आहे. त्यात शेतकर्यांचे नुकसान झाले असले तरी, अद्याप एकही लोकप्रतिनिधी त्यांच्या सांत्वन, मदतीला आला नाही. नुकसानीचे ऑनलाईन पंचनामे जाचक ठरत असल्याने सरसकट मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. एकीकडे, सोयाबीनच पिक शेतात काढणीला आले असताना, दुसरीकडे पीक काढणीसाठी मजुरांना एकरी चार ते पाच हजार द्यावे लागत असल्याने शेतकर्यांसमोर पुन्हा संकट उभा टाकले आहे. सोयाबीनला भाव नाही, आणि काढणीचा खर्चही वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.
———————