चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली तालुक्यातील मेरा व अंत्री खेडेकर या दोन सर्कलमध्ये लिंपी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, पशुपालक धास्तावले आहेत. या सर्कलमध्ये आतापर्यंत दोन जनावरांचा या रोगाने बळी घेतलेला आहे. तर १६ जनावरे यशस्वी उपचारानंतर बरी झाली आहेत. शेतकर्यांनी घाबरून जावू नये, लक्षणे आढळल्यास तातडीने संपर्क करावा, असे आवाहन अंत्री खेडेकरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता मोरे यांनी केलेले आहे.
चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथे पशुवैद्यकीय श्रेणी एक दवाखाना आहे. त्यामध्ये पाच गावांचा समावेश होतो. अंत्री खेडेकर, मेरा खु., चंदनपुर, कवठळ आणि असोला ही गावे या दवाखान्याअंतर्गत येतात. या पाच गावांमध्ये लिंपी रोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे आढळून आले असून, त्यापैकी १६ जनावरे उपचाराअंती बरी झाली आहेत. तर दोन जनावरे दगावली आहेत. यामध्ये मेरा खुर्द येथील गवई यांचा बैल व अंत्री खेडेकर येथील उद्धव शामराव माळेकर यांच्या कारवडचा समावेश आहे. तर काही जनावरे आजारी असून, त्यांच्यावर खेडोपाडी जाऊन उपचार केले जात आहेत.
या संदर्भात, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने अंत्री खेडेकरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता मोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की शेतकर्यांनी घाबरण्याचे काही कारण नाही. जनावरांना लिंपी रोगाची लक्षणे दिसत असल्यास पशुवैद्यकीय अधिकारी किंवा माझ्याशी संपर्क साधावा, आणि गाईपासून येणारे दूध हे उकळून प्यावे. इतर जनावरांना संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी आजारी जनावरापासून त्यांना दूर ठेवावे. तसेच, कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये, असे आवाहन त्यांनी शेतकर्यांना केलेले आहे.
——————