– दररोज किरकोळ अपघात; ठेकेदार कंपनीची मुजोरी, काम अतिशय संथगतीने सुरु!
किनगावजट्टू, ता. लोणार (प्रतिनिधी) – किनगावजट्टू ते बिबी या सहा किलोमीटरच्या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम तब्बल दीड वर्षांपासून रखडलेले असून, साखरखेर्डा येथील पलसिद्ध कंस्ट्रक्शन कंपनी हे काम गोगलगायीच्या गतीने करत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या ठेकेदार कंपनीने रस्ता खोदून, त्यावर भराव टाकून, त्यावर गिट्टीचा भराव टाकलेला आहे. या जीवघेण्या रस्त्यावर वाहने चालविणे ही दररोजची कसरत ठरत असून, त्यातून एखादी दुर्देवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक दुचाकीस्वार तर घसरून पडून गंभीर जखमी झालेले आहेत. या रस्त्यासंदर्भात अनेक निवेदने व तक्रारी झाल्यात, परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार कंपनीची चांगलीच मुजोरी वाढलेली आहे. तेव्हा, या रस्त्याच्या डांबरीकरणाचा मुहूर्त कधी मिळणार, सत्ताधारी पक्षाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर व या मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे या प्रश्नी लक्ष घालणार आहेत की नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
किनगाव जट्टू ते बिबी या सहा किलोमीटरच्या रस्त्याचे दुपदरी करण्याचे काम मागील दीड वर्षापूर्वी सुरु करण्यात आले होते. मागील कंत्राटदाराने थोडे फार काम करून हे काम आजरोजी पलसिध्द कंट्रक्शन कंपनी साखरखेर्डा येथील कंपनीला देण्यात आलेले आहे. या कंट्रक्शन कंपनीने रस्ता खोदून, त्यावर भराव टाकून, त्यावर गिट्टीचा भराव टाकलेला आहे. त्यामुळे हा रस्ता फारच धोकादायक बनलेला असून, ही ठेकेदार कंपनी अद्याप डांबर टाकायचे नाव घेत नाही. त्यामुळे या रस्त्यावरून दुचाकी, तीनचाकी वाहनधारकांना वाहने चालवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. अनेकवेळा कित्येक दुचाकीस्वार गाड्या घसरून गंभीर जखमी झाले आहेत. मागील दोन वर्षांपासून हे काम रखडल्यामुळे बिबी, खंडाळा, किनगावजट्टू येथील सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी यांनी प्रशासनाकडे निवेदने, मंत्रालयात पाठपुरावा केलेला आहे. तरीसुद्धा संबंधित ठेकेदार कंपनीने ज्या तत्परतेने काम करायला पाहिजे, त्या प्रमाणात ते तातडीने काम करतांना काही दिसत नाही. खराब रस्त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. सत्ताधारी शिंटे गटाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर व या मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी तातडीने, याप्रश्नी लक्ष घालून हा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम तातडीने करायला लावावे, अशी मागणी या भागातील ग्रामस्थ करत आहेत.
—————