CrimePachhim Maharashtra

मनोहर सपाटे पसार, पोलिसांकडून कसून शोध सुरु!

– राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्याच्याशी संबंध तोडले!

सोलापूर (विशेष प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता व माजी महापौर मनोहर सपाटे याच्याविरोधात गुरुवारी रात्री उशिरा विधवा शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार व शोषणाबाबत गुन्हा दाखल होताच, त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे एक पथक त्याच्या मागावर आहेत. परंतु, सपाटे याचा शोध लागत नसून, तो पसार झाला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी सांगितले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील त्याच्यापासून दूर राहणेच पसंत केले असून, त्याला पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमास बोलावू नये, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसने काढले आहेत.

संस्थेतल्या शिक्षिकेसोबत जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेक वर्षांपासून नैसर्गिक व अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संस्थेचे संस्थापक तथा माजी महापौर मनोहर सपाटे याच्यावर गुरुवारी रात्री उशिरा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नैसर्गिक तसेच अनैसर्गिक अत्याचार व खंडणीचा गुन्हा पोलिसांनी त्याच्याविरोधात नोंदवला असून, त्याचा कसून शोध सुरु आहे. परंतु, त्याला अटक करण्यासाठी तो पोलिसांना सापडत नाही. गुन्हा दाखल झाल्याने आता फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पथक त्याच्या मार्गावर आहे. मनोहर सपाटे यांना शोधण्यासाठी आम्ही घरी देखील गेलो व सर्वत्र त्यांचा शोध घेतला. परंतु ते कुठेही मिळून येत नाहीत. सपाटेंचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब, पंचनामे, खंडणी मागितल्याचे मोबाईल रेकॉर्डिंग, अत्याचार ग्रस्त ठिकाणाची पाहणी करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील सपाटे याच्याशी संबंध तोडले आहेत. मनोहर सपाटे यांनी पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमास उपस्थित राहू नये व त्यांना बोलवूदेखील नये, असा आदेश राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूर शहरचे अध्यक्ष भारत जाधव यांना दिला आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!